ट्रकची बोलेरो गाडीला धडक, गाडीतील लोक जखमी, ट्रकचालक अटकेत
पिंपरी, ता. ४ - मद्यधुंद ट्रक चालकाने बोलेरो गाडीला जोरदार धडक दिल्याने गाडीतील लोक जखमी झाले आणि या ट्रकने पुढे जाऊन आणखीही वाहनांना धडक दिली. हा अपघात शुक्रवारी (ता. ३) खेड तालुक्यातील धानोरे फाटा परिसरात घडला. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ट्रकचालक सोनू कैलाश पांडे (रा. सोहाना, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११० मोटार वाहन कायदा कलम १८४,१८५ प्रमाणे आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामगीर सुदामगीर गोसावी (वय ४०, रा. मलढोण, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे त्यांच्या बोलेरो गाडीतून आळंदीहून जेजुरीकडे जात होते. शुक्रवारी (ता. ३) दुपारी सुमारे २.१३ वाजता धानोरे फाटा, पुष्पक कंपनीजवळ पोहोचल्यावर समोरुन येणाऱ्या टाटा अल्ट्रा ट्रक चालकाने मद्यप्राशन करुन बेदरकारपणे वाहन चालवत त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.
या अपघातात बोलेरोमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळी न थांबता पुढे निघून गेला आणि पुढे जाताना इतर वाहनांनाही धडक दिल्याचे समोर आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.