‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत - मुख्यमंत्र्यांचे निर्देश
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत - मुख्यमंत्र्यांचे निर्देश
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची बैठक
पुणे, ता. ३० - ‘एल निनो’च्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. विविध हवामान संस्थांच्या या वर्षीच्या 'एल निनो'च्या इशाऱ्यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी शासन सज्ज आहे. त्यामुळे एल निनोचे संभाव्य संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती असून कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे 'आर्च पद्धतीने ' पुलवजा करण्याबाबत पडताळणी करावी, जलसंधारणाचे कुठलेही नवीन काम न घेता दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावी. आपत्ती व्यवस्थापन विभागाने मागील वर्षांमध्ये महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थिती असलेले भाग चिन्हांकित करावेत. संबंधित भागात तत्कालीन परिस्थितीमध्ये राबविलेल्या उपाययोजनांच्या अहवाल द्यावा. राज्यात कृषी क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेचे वितरण करण्यात यावे. सौर ऊर्जा विषयक उपकरणांच्या दुरुस्तीसाठी संबंधित गाव, पाड्यात दुरुस्तीबाबत कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबवावा. कृषीसाठी विजेचा जास्त वापर होत असलेल्या सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांसाठी वेगळे नियोजन करावे. या जिल्ह्यांमध्ये 'फिडर' वर दबाव न येता विजेचे वहन एका फिडरवरून दुसऱ्या फिडरवर करता येईल, अशा पद्धतीने व्यवस्था निर्माण करण्यात यावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बैठकीस जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा (कृष्णा आणि गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. विदर्भ, तापी, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.