news
clock
पुण्यातील 'एम्प्रेस गार्डन'ची जागा न्यायालयीन इमारतीसाठी देण्यास नागरीकांचा विरोध

पुण्यातील 'एम्प्रेस गार्डन'ची जागा न्यायालयीन इमारतीसाठी देण्यास नागरीकांचा विरोध

पुण्यातील 'एम्प्रेस गार्डन'ची जागा न्यायालयीन इमारतीसाठी देण्यास नागरीकांचा विरोध

दि अॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया'कडून जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

पुणे, ता. २८  - पुण्यातील कॅम्प परिसरातील 'एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन'ची १ एकर जागा जागा न्यायालयीन इमारतीच्या कामासाठी हस्तांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. या निर्णयाला तमाम पुणेकरांसह 'दि अॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया'ने विरोध केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि 'एम्प्रेस गार्डन' सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावर प्रेमींनी व सामाजिक संस्था  जनआंदोलन उभारावे, अशी हाक अॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटीने दिली आहे.

या संदर्भात 'दि अॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया'चे अध्यक्ष प्रताप पवार आणि मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी शुक्रवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

पवार म्हणाले, "पुणे शहरात सिमेंट काँक्रिटीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरातील हा हरित पट्टा नष्ट झाल्यास पर्यावरणावर दूरगामी परिणाम होतील. शहरातील अनेक सरकारी जागांवर अतिक्रमण झाले आहे. तेथील नागरिकांचे पुनर्वसन करुन पर्यायी जागा सरकारने न्यायालयाच्या इमारतीसाठी उपलब्ध करुन द्यावी.''

''संस्थेमार्फत सन १८९२ पासून, म्हणजे तब्बल १३४ वर्षांपासून या उद्यानाचे जतन केले जात आहे. उद्योगपती  शंतनूराव किर्लोस्कर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारातून या उद्यानाचा विकास झाला. ज्येष्ठ उद्योगपती आणि लोकसहभागातून ३५ ते ४० कोटी रुपये खर्च करुन हा हरित वारसा जपला आहे. ब्रिटिश काळात सेंट्रल अमेरिका आणि आफ्रिकेतून आणलेल्या शेकडो दुर्मिळ वृक्ष आणि वेलींचे संवर्धन करण्यात आले आहे. संबंधित जागेवर भविष्यात 'जैवविविधता पार्क' उभारण्याच्या दृष्टीने शेकडो वृक्षांची लागवडही केली आहे. '' असे पवार व पिंगळे यांनी सांगितले.

''या उद्यानाची जागा इमारतीसाठी दिल्यास नैसर्गिक परिसंस्था नष्ट होण्याची भीती आहे. जागा हस्तांतरण प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून संस्थेने वारंवार आंदोलने, निवेदने देत निषेध नोंदविला आहे. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या संस्थांकडून उद्यानाचे संवर्धन करुन पर्यावरण जपले जाते, त्यांचे कौतुक करणे दूरच, त्यांना अडचणीत आणले जात आहे.'', अशी नाराजी पवार व पिंगळे यांनी व्यक्त केली. 'एम्प्रेस गार्डन' सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावर प्रेमींना व सामाजिक संस्थांना जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories