पिंपरी-चिंचवड : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवून निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांशी संबंधित डीजे चालक आणि मालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. १४ सप्टेंबर २०२६ पासून आजतागायत संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ५० गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक २९ गुन्हे परिमंडळ-२ मध्ये दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. त्यापूर्वी पोलीस आयुक्तांनी आयुक्तालय स्तरावर गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करावा; मात्र डीजेसारख्या वाद्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती तसेच आजारी रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार परिमंडळ स्तरावर संबंधित पोलीस उपायुक्तांनीही त्यांच्या कार्यक्षेत्रातील गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन गणेशोत्सवाच्या परवानगी प्रक्रियेसह ध्वनिप्रदूषण टाळण्याबाबत सूचना दिल्या होत्या. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांच्या सूचनेनुसार डीजेचा वापर टाळला.
मात्र, काही मंडळांकडून सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गणेश विसर्जनादरम्यान डीजे वाजवून निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन आणि ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी संबंधित डीजे चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
कारवाईमध्ये परिमंडळ-१ मध्ये १५, परिमंडळ-२ मध्ये २९, परिमंडळ-३ मध्ये ५ आणि परिमंडळ-४ मध्ये १, असे एकूण ५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये मुद्देमालही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.