विविध विचार प्रवाहांमुळे आजची कामगार चळवळ दुर्बळ - ज्येष्ठ नेते उल्हास पवार ........... चिंचवड येथे एच. ए. कामगार लढ्याची यशोगाथा असलेल्या 'गाथा संघर्षाची' या पुस्तकाचे प्रकाशन
विविध विचार प्रवाहांमुळे आजची कामगार चळवळ दुर्बळ - ज्येष्ठ नेते उल्हास पवार
चिंचवड येथे एच. ए. कामगार लढ्याची यशोगाथा असलेल्या 'गाथा संघर्षाची' या पुस्तकाचे प्रकाशन
पिंपरी, ता. २९ : "आजच्या कामगार चळवळीत अनेक प्रवाह असल्यामुळे आपापसात वैचारिक लढाई सुरु असते. त्यामुळे कामगार चळवळ दुर्बळ झाली आहे. सत्याग्रही मार्गाने चळवळ चालवणे अवघड झाले आहे. समाजकारण, राजकारण यात सुसंस्कृतपणा हरवला आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजाला विधायक ऊर्जा देणाऱ्याच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे." असे प्रतिपादन जेष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले आहे.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात एच. ए. कामगार लढ्याची यशोगाथा असलेल्या "गाथा संघर्षाची" या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे पुस्तक कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांचे आत्मकथन असून, दादाभाऊ गावडे यांनी या पु्स्तकाचे लेखन केले आहे. बोऱ्हाडे यांनी कामगार चळवळीतील सहकाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत, उद्याच्या पिढीला संघर्षाची व अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी आत्मकथन पुस्तक रुपी ठेवा अर्पण केला आहे, असे सांगितले. लेखक दादाभाऊ गावडे म्हणाले की, "कामगारांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी पुस्तक उपयोगी पडेल".
यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे , डॉ. कैलास कदम, माजी महापौर संजोग वाघेरे, दिलीप पवार, मारुती भापकर, सोपान खुडे, प्रभाकर ओव्हाळ, राजेंद्र घावटे, विजय लोखंडे, तात्यासाहेब शितोळे, विजय पाटील, अनिल रोहम, संभाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. कैलास कदम यांनी केले. सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी केले. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन इंद्रायणी साहित्य परिषदेच्या संदीप तापकीर, डॉ. सीमा काळभोर, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, रामभाऊ सासवडे, दामोदर वहिले, तेजस्विनी देशमुख आदींनी केले.