शहरात आतापर्यंत एकूण ११९ मुलींचे 'एचपीव्ही' लसीकरण
पिंपरी, ता. २३ - महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरु आहे. महापालिकेतर्फे आतापर्यंत एकूण ११९ मुलींचे लसीकरण
यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही
लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत एचपीव्ही लस दिली जाते. तसेच सर्व लाभार्थ्यांची नोंद यू-विन पोर्टलवर करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या १४ वर्षे वयोगटातील मुलींना नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयात नेऊन मोफत एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि कर्करोगमुक्त भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले. सर्व मनपा रुग्णालये व दवाखाने पूर्णतः सुसज्ज असून, आवश्यक मनुष्यबळ, सुविधा आणि उपचार उपलब्ध आहेत.
लसीकरण वेळेत करुन घ्यावे....
''एचपीव्ही लसीकरणाद्वारे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आहे. पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण वेळेत करुन घ्यावे.'', असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
१४ वर्षाच्या मुली 'एचपीव्ही' लसीसाठी पात्र....
भारत सरकारच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १४ वर्षाच्या मुली या एचपीव्ही लसीसाठी पात्र आहेत. तथापि, काही परिस्थितींमध्ये एचपीव्ही लसीकरण दिले जाणार नाही किंवा पुढे ढकलले जाईल.
यात १४ वर्षाच्या लक्ष्य वयोगटाबाहेरील मुली, गर्भधारणा असलेली व्यक्ती, पूर्वी २ एचपीव्ही लस (गार्डासिल किंवा सर्वाव्हॅक) घेतलेली असल्यास, लस किंवा तिच्या घटकांमुळे (यीस्ट) तीव्र अॅलर्जीचा इतिहास असलेली तसेच मध्यम ते गंभीर आजार असलेल्या मुली यांचा समावेश होतो. अशा प्रकरणांमध्ये संबंधित मुलगी पूर्णपणे बरी झाल्यानंतरच लसीकरण करणे आवश्यक आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.