आयआयबीएम कॉलेजचा विद्यार्थी सौरभ गायकवाड याची सर्वोच्च न्यायालयात ‘ज्युनिअर कोर्ट अटेंडंट’पदी निवड
आयआयबीएम कॉलेजचा विद्यार्थी सौरभ गायकवाड याची सर्वोच्च न्यायालयात ‘ज्युनिअर कोर्ट अटेंडंट’पदी निवड
पिंपरी, ता. ६ - चिखली येथील आयआयबीएम (IIBM)कॉलेजचा विद्यार्थी सौरभ सुरेश गायकवाड याची भारतीय सर्वोच्च न्यायालयात ‘ज्युनिअर कोर्ट अटेंडंट’ या अत्यंत मानाच्या पदावर निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे दालवडी- फलटण गावाचे नाव संपूर्ण देशात उज्वल झाले आहे.
सौरभ हा मूळचा दालवडी-फलटण गावचा आहे. सौरभ गायकवाड याने आयआयबीएम कॉलेजमधून हॉस्पिटल मॅनेजमेंटची पदवी मिळवली आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. शहरात येऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तो जिद्दीने शिक्षण घेत राहिला, मेहनत करत राहिला. प्रतिकूल परिस्थितीत त्याने मिळवलेले हे यश सर्व तरुणाईसाठी प्रेरणा देणारे आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना सौरभ म्हणाला, ''कॉलेजने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक वातावरणामुळे आणि प्रोत्साहनामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोठे बळ मिळाले. '' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, शितल वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर, विभाग प्रमुख अमोल भागवत, अनिकेत वंजारी आणि प्रतीक्षा डफळ यांचे सौरभला मार्गदर्शन लाभले.
इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी.....
''सौरभची निवड ही आमच्या संस्थेसाठी आणि संपूर्ण चिखली परिसरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अत्यंत गरिबीतून शिकून, कोणतीही तक्रार न करता केवळ मेहनतीच्या जोरावर त्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंत मजल मारली आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असते, त्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की ते असाच इतिहास घडवतात. सौरभचा प्रवास हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.''
— डॉ. धनंजय वर्णेकर (संस्थापक अध्यक्ष, आयआयबीएम कॉलेज)
संस्थेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध
''आमच्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देश-विदेशात १००% रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. केवळ खासगी क्षेत्रच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीतही यश मिळवावे, यासाठी आम्ही त्यांना सातत्याने मार्गदर्शन करतो. हॉस्पिटॅलिटी हे एक अफाट विस्तारलेले क्षेत्र आहे, जिद्दीच्या जोरावर विद्यार्थी या उद्योगासह सरकारी सेवांमध्येही आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतात.''
— अमोल भागवत (विभागप्रमुख, IIBM)