‘कुरिअर पार्सल’सेवेच्या नावाखाली बेकायदेशीर मालवाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार
पावसाळी अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांच्या प्रश्नावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
पिंपरी, ता. २४ - महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पिंपरी-चिंचवडसह राज्यातील विविध भागांमध्ये खाजगी प्रवासी व लक्झरी बसेसच्या माध्यमातून ‘कुरिअर पार्सल’ सेवेच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर मालवाहतुकीबाबत आमदार शंकर जगताप यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
प्रवासी वाहनांच्या टपावर, डिकीमध्ये तसेच बसच्या अंतर्गत भागात नियमबाह्य पद्धतीने मालवाहतूक केली जात असल्याने वाहतूक कोंडी, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि अपघातांचा धोका वाढत असल्याची बाब आमदार जगताप यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रसंगी उपस्थित प्रश्नांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच, चौथ्या गुन्ह्यानंतर थेट परमिट रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
याबाबत बोलताना आमदार जगताप म्हणाले की, ''प्रवाशांच्या जीवाशी खेळून खाजगी बसेसमधून होणारी बेकायदेशीर मालवाहतूक हा अत्यंत गंभीर विषय आहे. केवळ दंड आकारून हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर परवाना निलंबन तसेच चौथ्या गुन्ह्यानंतर थेट परवाना रद्द करण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे अवैध पार्सल वाहतुकीला आळा बसून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल. तसेच आरटीओ प्रशासनाने या आदेशांची कठोर अंमलबजावणी करावी, हीच आमची आग्रही भूमिका आहे. प्रवाशांची सुरक्षितता, वाहतुकीतील शिस्त आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासाठी अशा नियमबाह्य प्रकारांविरोधातील पाठपुरावा यापुढेही कायम राहील.''