जय हिंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. धनंजय ठोके यांना 'नव्वदोत्तरी दलित नाटक व दलित रंगभूमी' या विषयात पीएचडी प्रदान
जय हिंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. धनंजय ठोके यांना 'नव्वदोत्तरी दलित नाटक व दलित रंगभूमी' या विषयात पीएचडी प्रदान
पिंपरी, ता. ६ - जय हिंद कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक धनंजय शिवचंद ठोके यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मराठी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी 'नव्वदोत्तरी दलित नाटक व दलित रंगभूमी' या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातून त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. त्यांना डॉ. संभाजी मलघे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हा शोधप्रबंध पूर्ण करण्यासाठी त्यांना तब्बल १० वर्षे लागली. भविष्यात या शोधप्रबंधावर आधारित पुस्तक लिहिण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. प्रा. धनंजय ठोके यांचे उच्च शिक्षण (एम.ए., बी.एड., एम.एड., एम.फिल. आणि नेट) मराठी विषयातून झाले आहे. पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
या यशाबद्दल बोलताना प्रा. ठोके म्हणाले, ''पीएचडी प्रवेशानंतर काही महिन्यांतच संपूर्ण जगावर कोव्हिडचे संकट ओढवले. या अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण काळात संशोधन पुढे सुरू ठेवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, ग्रंथालयांची मदत, मार्गदर्शकांचे सहकार्य आणि मित्रांची साथ यांच्या बळावर मी संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले. माझ्या लेखनाचे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणास्त्रोत आहेत. मार्गदर्शक डॉ. संभाजी मलघे, सहकारी शिक्षक, मित्र परिवार आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे मी हे संशोधन कार्य पूर्णत्वास नेऊ शकलो.''