.......होणाऱ्या पत्नीनेच घेतला केतनचा जीव, मित्राच्या मदतीने दरीत ढकलले
पुणे, ता. २३ - पुण्यातील युवा उद्योजक केतन अग्रवाल याचा १८ जूनला लोहगडावर फोटो काढताना पाय घसरुन दरीत पडल्याने मृत्यू झाला. कारण, स्वतःच्या लग्नाची तयारी सुरु असताना केतनला आपले प्राण गमवावे लागले. ही बातमी ऐकून व वाचून राज्यभरातील पालक-तरुणाई हळहळली. मात्र, या घटनेचा तपास करताना आता हादरुन टाकणारी बाब समोर आली आहे ती म्हणजे.....केतनचा मृ्त्यू पाय घसरुन पडल्याने नाही तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने मित्राच्या मदतीने केतनला दरीत ढकलले आहे.
लोणावळा पोलिसांच्या तपासात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी मिळून हत्येचा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस, शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकांनी कठीण परिस्थितीत बचावकार्य राबवून केतनचा मृतदेह ४०० फूट खोल दरीतून बाहेर काढला. सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी 'अकस्मात मृत्यू'ची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना घटनाक्रमात काही विसंगती जाणवू लागल्या. पोलिसांनी किल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू केली. यावेळी पोलिसांना एका संशयित तरुणाच्या हालचाली दिसल्या. गेल्या आठवड्यात लोणावळ्यात प्रचंड उकाडा आणि कडक ऊन असतानाही, एक तरुण अंगात जाडजूड 'हुडी' (जॅकेट) घालून वावरत होता. त्याने कानात हेडफोन घातले होते आणि हुडीच्या साहाय्याने तो स्वतःचा चेहरा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. भर उन्हातल्या त्याच्या या पेहरावाने पोलिसांना संशय आला आणि तपासाला वेगळे वळण लागले. पोलिसांनी त्या संशयित तरुणाचा माग काढला. सखोल चौकशी केली तेव्हा हा अकस्मात मृत्यू नाही तर कट असल्याचे उघड झाले.
सियाचे केतनशी लग्न ठरले होते. मात्र, या नात्यात खूश नव्हती. त्यामुळे तिने तिच्या एका मित्रासोबत मिळून केतनला संपवण्याचा कट रचला होता. पोलिसांनी गोपनीय माहिती, साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या (CDR, IPDR एनालिसिस आणि सीसीटीव्ही फुटेज) आधारे सखोल तपास सुरू केला. यात समोर आले की, सियाचे पुणे मार्केट यार्ड परिसरात दुकान असलेल्या चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत गेल्या एका वर्षापासून प्रेमसंबंध होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. सियाच्या प्रेमसंबंधात केतन आडकाठी ठरत असल्याने सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला मारण्याचा कट रचला.
या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कलम १०३ (BNS) आणि ६१(२) अंतर्गत खुनाचा गुन्हा (गु.र.नं. १६८/२०२६) दाखल केला आहे. आधिक तपासात सिया व केतनने खुनाची कबुली दिली आहे. सिया व तिचा मित्र चैतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे.