news
clock
पिंपळे सौदागर येथील कियान्श शर्मा याचे आंतरराष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत यश

पिंपळे सौदागर येथील कियान्श शर्मा याचे आंतरराष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत यश

पिंपळे सौदागर येथील कियान्श शर्मा याचे आंतरराष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत यश 

पिंपरी, ता. ४ - पिंपळे सौदागर येथील कियान्श शर्मा याने ‘MaRRS International Spelling Bee Competition’ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. पिंपरी-चिंचवडसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कियान्शच्या या देदीप्यमान यशाची दखल घेत  नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.

कियान्शने २६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीत हे यश संपादन केले. या स्पर्धेत जगातील विविध देशांतील  विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यांना मागे टाकत कियान्शने आपले स्थान निश्चित केले. कियान्श हा पिंपळे सौदागर येथील विबग्योर राइज स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याचा या आंतरराष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेतील प्रवास शालेय स्तरावरुन सुरु झाला होता. त्यानंतर आंतरशालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठीण फेऱ्या त्याने आपल्या एकाग्रता आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वीरित्या पार केल्या. अखेर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली.

कियान्शचा सत्कार करताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, “पिंपळे सौदागरमधील एका चिमुकल्याने जागतिक स्तरावर आपल्या शहराचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कियान्शचे यश हे त्याच्या शिस्तीचे आणि मेहनतीचे फळ आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात अशा प्रकारची बुद्धिमत्ता जोपासणे कौतुकास्पद आहे. तो शहरातील इतर अनेक विद्यार्थ्यांसाठी एक मोठे प्रेरणास्थान ठरला आहे.” या प्रसंगी कियान्शचे पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्वांनीच त्याच्या या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories