कुदळवाडीतील गोदामाला भीषण आग, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु....
May 07 2026
63
कुदळवाडीतील गोदामाला भीषण आग, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु
नुरा मशिदीजवळील घटना, धुराचे प्रचंड लोळ, नागरीकांमध्ये घबराट
पिंपरी, ता. ७ - चिखलीतील कुदळवाडी परिसरात नुरा मशिदीजवळ असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (ता. ७) सायंकाळी ५ च्या सुमारास घडली आहे. आगीमुळे आकाशात धुराचे प्रचंड लोळ पसरले असून दूरवरूनही धूर दिसत होता. परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अचानक लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने संबंधित गोदामाच्या आजूबाजूचा परिसर तुलनेने मोकळा असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेसाठी परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर नेण्यात आले आहे. पोलिसांकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. आगीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.