जमीन खरेदी व्यवहारात बांधकाम व्यवसायिकाची २६ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. ४ - जमिनीचे खरेदी खत करण्यासाठीच्या व्यवहारात एका व्यावसायिकाती तब्बल २६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. आढले खुर्द - मावळ येथे ऑक्टोबर २०२० पासून ते आत्तापर्यंत ही फसवणूक झाली असून आरोपींवर शुक्रवारी (ता. ३) शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, संजय पांडुरंग नरोडे (वय ५५ वर्षे, व्यवसाय - रिअल इस्टेट, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहन जयंवत येवले (वय ५८ वर्षे) व आशा मोहन येवले (वय ५१ वर्षे) दोघेही (रा. आढले खुर्द, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी आढले खुर्द येथील गट क्र. २५५ मधील १५००० चौरस फूट जागेबाबत फिर्यादी नरोडे यांच्याबरोबर सामंजस्य करार केला. मात्र, सदर जागेचे अद्यापपर्यंत खरेदी खत करुन दिलेले नाही. एका आरोपीने त्यांच्या खाते क्रमांकावर आर.टी.जी.एस व्दारे फिर्यादीकडून २०,००,०००/- रुपये घेतले आणि दुसऱ्या आरोपीने रोख ६ लाख रुपये घेतले आणि अजूनही खरेदीखत करुन दिलेले नाही. त्यामुळे, फिर्यादी नरोडे यांनी एकूण २६,००,०००/- रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करुन मारण्याची धमकीही दिली आहे.
या प्रकरणी आरोपींविरोधात शिरगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ३) गुन्हा भारतीय न्याय संहीता कलम ३१८ (२), ३५१ (२), ३५२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटक नाहीत.