टू व्हीलर टॅक्सीला विरोध अन् विविध मागण्यांसाठी १० ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी व पुणे आरटीओ कार्यालयावर तीव्र आंदोलन; महाराष्ट्र रिक्षा पंचायतीची घोषणा
टू व्हीलर टॅक्सीला विरोध अन् विविध मागण्यांसाठी १० ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी व पुणे आरटीओ कार्यालयावर तीव्र आंदोलन; महाराष्ट्र रिक्षा पंचायतीची घोषणा
पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ - महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 'टू व्हीलर टॅक्सी'ला दिलेली परवानगी तत्काळ रद्द करावी, यासह रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १० ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी पिंपरी येथे पार पडलेल्या बैठकीत नुकतीच ही घोषणा केली.
हे आंदोलन पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी १० वाजता आणि पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO)येथे दुपारी १२:३० वाजता होईल.
या दोन्ही आंदोलनांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील सर्व ऑटो, टॅक्सी व कॅब चालक-मालक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने केले आहे.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले, "रिक्षाच्या बाजूला आता टू व्हीलर उभे राहून प्रवासी घेऊन जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आधीच ५५ हजार रिक्षा आहेत, तर पुणे शहरात दीड लाख रिक्षा आहेत. शहरात अगोदरच प्रवासी कमी आणि रिक्षा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच टू व्हीलर टॅक्सी आल्यास रिक्षा व्यवसाय पूर्णपणे मोडीत निघेल आणि रिक्षाचालकांना आत्महत्येची वेळ येईल. म्हणूनच आमचा टू व्हीलर टॅक्सीला तीव्र विरोध आहे.'' "पुणे जिल्हाध्यक्ष संतोष नाना गुंड यांनीही, "हा रिक्षा चालक-मालकांच्या अस्तित्वाचा लढा असून, सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे,"* असे आवाहन केले.
या बैठकीस महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष नाना गुंड, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विजय ढगारे, राज्य प्रवक्ते धनंजय कुटे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष जाफर भाई शेख, पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष दीपक ताटे, पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष विशाल ससाने, उपाध्यक्ष भाऊसाहेब शेलार, पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे अध्यक्ष अशोक तात्या ठाकूर, विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष प्रदीप अय्यर, पिंपरी-चिंचवड शहर प्रसिद्धी प्रमुख नामदेव मेहेर, निगडी विभाग अध्यक्ष अविनाश साळवे, उपाध्यक्ष अँथनी पंडित, महिला अध्यक्षा फातिमा शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांना आयकार्ड चे वाटप करण्यात आले
प्रमुख मागण्या -
१. टू व्हीलर टॅक्सी बंदी: शासनाने टू व्हीलर टॅक्सीला दिलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी.
२. अॅग्रीगेटर पॉलिसीतील त्रुटी दूर कराव्यात: अॅग्रीगेटर धोरणातील चुकीचे निर्णय (उदा. पुलिंग कॅप इ.) रद्द करण्यात यावेत.
३. रिक्षाचालकांसाठी अनुदान: पीएमपीएलच्या धर्तीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने रिक्षाचालकांना आर्थिक अनुदान द्यावे.
४. दोषपूर्ण पासिंग सिस्टीम बंद करावी:आरटीओ कार्यालयामार्फत बसवण्यात आलेल्या ऑटोमॅटिक (ATS) मशीन्समुळे जवळपास १०० पैकी ७० गाड्या नापास होत आहेत. ही सदोष सिस्टीम तत्काळ रद्द करावी किंवा चालकांना विश्वासात घेऊन त्यात योग्य दुरुस्ती करावी.
५. कल्याणकारी मंडळ लागू करावे:रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांच्या कल्याणकारी मंडळाबाबत तात्काळ बैठक घेऊन या मंडळाची अंमलबजावणी करावी.
६. बेकायदेशीर कंपन्यांवर कारवाई: ओला, उबरसारख्या भांडवलदार कंपन्यांनी कोणताही परवाना न घेताच बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू केला असून, त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
७. भारत टॅक्सीवर कारवाई:भारत टॅक्सीमध्ये व्हाईट प्लेट (वैयक्तिक) टू व्हीलर गाड्यांचा वापर संपूर्ण भारतभर केला जात आहे, ज्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. अशा भारत टॅक्सीवर कठोर कारवाई करावी.
८. प्रामाणिक चालकांना संरक्षण: नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकांना सहकार्य व सपोर्ट देण्यात यावा आणि नियम धाब्यावर बसवून मनमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.