पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या (PCSCL) सह मुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) पदी शहर अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे पार पडलेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणे आणि नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटीचे माजी शहर अभियंता मकरंद निकम यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर मनोज सेठिया यांची निवड करण्यात आली आहे.
मनोज सेठिया हे शहर अभियंता म्हणून कार्यरत असून आता त्यांच्याकडे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांना अधिक वेग मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, शहर अभियंता तथा नवनियुक्त सह मुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) मनोज सेठिया, संचालक प्रदीप भार्गव आणि यशवंत भावे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि संचालक उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची अंमलबजावणी, त्यांना गती देणे आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा विकसित करण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.