मोशी | 22 सप्टेंबर 2026 : भारतमाता चौकात सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीवरून चौक ओलांडत असलेल्या 57 वर्षीय व्यक्तीच्या ॲक्टिव्हाला एसटी बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एसटी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष बाजीराव कुंभार (वय 54, रा. साई एक्झॉटिक, बगवस्ती, पाटीलनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे भाऊ अरुण बाजीराव कुंभार (वय 57, रा. अक्ष अमूल्यम, डुडुळगाव-मोशी आळंदी रोड) यांचा अपघातात मृत्यू झाला.
22 सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अरुण कुंभार हे ॲक्टिव्हा (एमएच 14 ईएफ 7753) वरून चिखलीकडून डुडुळगाव-मोशीकडे जात होते. भारतमाता चौकातील आळंदीकडे जाणारा सिग्नल सुटल्यानंतर ते चौक ओलांडत असताना चाकणकडून आलेल्या एसटी बस (एमएच 20 जीसी 3685) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संजय गजानन कोंढुरकर (वय 42, रा. सिन्नर, जि. नाशिक) असे बसचालकाचे नाव आहे. अपघातात अरुण कुंभार यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.