आळंदी | 22 सप्टेंबर 2026 : घराच्या दारासमोर मोठमोठ्याने शिवीगाळ आणि आरडाओरडा करू नको, असे सांगितल्याच्या कारणावरून 35 वर्षीय महिलेला हाताने मारहाण करून तिच्या दिशेने दगड फेकल्याची घटना मरकळ येथे घडली. दगड लागल्याने महिलेच्या डाव्या हाताच्या दंडाला दुखापत झाली.
या प्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराव किसन सहारे (वय 39, रा. कोपरा, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. घटना 21 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कमळजाई वस्ती, मरकळ, ता. खेड येथे घडली.
आरोपी फिर्यादीच्या दारासमोर येऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. फिर्यादीने बाहेर येऊन येथे आरडाओरडा करू नको, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने तिचे न ऐकता हाताने मारहाण केली. बाजूला पडलेला दगड उचलून तिच्या दिशेने फेकला. तो दगड डाव्या हाताच्या दंडाला लागून दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.