news
clock
शहरातील थोर व्यक्तिंची स्मारके समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची ठरतील - रामदास आठवले

शहरातील थोर व्यक्तिंची स्मारके समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची ठरतील - रामदास आठवले

 शहरातील थोर व्यक्तिंची स्मारके समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची ठरतील - रामदास आठवले 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या उपस्थितीत पिंपरी येथे माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमीपूजन  

पिंपरी, ता. २८ - ''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे नव्हती पैशांची कमाई,                                                                            तरी त्यांच्या पाठीशी होती रमाई '' ........असे माता रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी गौरवोद्गार व्यक्त करुन  पिंपरी-चिंचवडमध्ये माता रमाईंचे स्मारक होत असल्याचा आनंद केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला. शहरात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यांचे स्मारक आहे. आता माता रमाईंचे स्मारकही साकारणार आहे. ही स्मारके समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची ठरणार आहेत, अशी भावना आठवले यांनी व्यक्त केली. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील भीमसृष्टीच्या शेजारी साकारणार असलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमीपूजन मंगळवारी (ता. २८) केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले. माता रमाईंचे हे आपल्या देशातील पहिले स्मारक आहे. या भूमीपूजन समारंभला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, पुणे महापालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, अमित गोरखे, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते, शहरातील नगरसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे असंख्य अनुयायी उपस्थित होते. 

रामदास आठवले यांनी मनोगत व्यक्त करताना माता रमाईंच्या साथीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनमोल कार्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, ''बाबासाहेबांनी वेशीबाहेर टाकल्या गेलेल्या दलितांच्या पुनरुत्थानसाठी कार्य केले. देशाला ताकदवान संविधान दिले आणि यासाठी माता रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. थोर माता रमाईंचे स्मारक पिंपरी-चिंचवडमध्ये होतेय याचा मोठा आनंद आहे. सन २०१७ मध्ये आरपीआयच्या नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी माता रमाईंच्या स्मारकाची मागणी केली होती. त्यानंतर आत्तापर्यंत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, नगरसेवक कुणाल वाव्हळकर व धर्मपाल तंतरपाळे यांनी या स्मारकासाठी पाठपुरावा केला. महापालिकेतील नेत्यांनीही स्मारकासाठी पावले उचलली. महापालिका आयुक्तांनीही लवकर कार्यवाही केली याचे समाधान आहे. आता माता रमाईंच्या स्मारकाचे काम वेळेत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.''

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर म्हणाले, ''पिंपरी-चिंचवडमध्ये माता रमाईंचे स्मारक महापालिकेच्या वतीने उभे राहतेय याचा आनंद आहे. या शहरात अनेक थोर व्यक्तींची स्मारके आहेत. त्यामध्ये माता रमाईंच्या स्मारकाची कमी होती. ही उणीव पिंपरी-चिंचवड महापालिकेने भरुन काढली आहे. थोर व्यक्तींची स्मारके उभारुन पिंपरी-चिंचवड महापालिकेने खऱ्या अर्थाने थोर व्यक्तिंचा सन्मान केला आहे. त्याबद्दल महापौर व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.''

प्रारंभी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम झाला. महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे व जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी आभार मानले. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories