पावसाळ्यात ट्रेकिंगला जा, पण सुरक्षेची खबरदारी घ्या, जाणकारांच्या सूचनांचे पालन करा
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांचे आवाहन
पुणे, ता. २४ - पावसाळा सुरु झाल्याने निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स दरवर्षी सह्याद्रीकडे आकर्षित होतात. मात्र, या सौंदर्यासोबत अनेक नैसर्गिक धोकेही निर्माण होतात. सह्याद्रीतील पावसाळा खरच अनुभवला पाहिजे. पण तो अनुभवताना सुरक्षेची खबरदारी घेणे तितकेच महत्वाचे आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने प्रसारित केलेल्या सुचनांचे पालन केल्यास नक्कीच पावसाळ्यात मानवी चुकांमुळे घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना पायबंद बसेल आणि सर्व जण सुरक्षित पावसाळी भटकंती करू शकतील, असा मोलाचा सल्ला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी दिला आहे.
झिरपे यांनी सांगितले आहे की, पावसाळ्यात सह्याद्रीतील वाटा अत्यंत निसरड्या होतात. दाट धुके, वाढलेले गवत, कमी दृश्यमानता, वेगाने वाढणारे पाण्याचे प्रवाह, दरडी कोसळण्याचा धोका, तटबंदीवरील सैल दगड तसेच अचानक बदलणारे हवामान यामुळे अपघातांची शक्यता वाढते. दरवर्षी अनेक पर्यटक धबधब्यांच्या प्रपाताखाली जाणे, धोकादायक कड्यांवरून छायाचित्रण करणे, पाण्याच्या प्रवाहात उतरून साहस करणे किंवा अपरिचित दुर्गम भागात जाणे यामुळे दुर्घटनाग्रस्त होताना दिसतात. त्यामुळे सह्याद्रीत साहस जरूर करावे; मात्र अति-साहस टाळावे. एकट्याने भटकंती करू नये, हवामानाचा अंदाज तपासूनच ट्रेकचे नियोजन करावे, प्रथमोपचार साहित्य, आणि आवश्यक सुरक्षा साहित्य सोबत ठेवावे तसेच ट्रेकची माहिती कुटुंबीयांना द्यावी.
राज्यातील विविध गिर्यारोहण संस्था आणि स्वयंसेवक गेली अनेक वर्षे निस्वार्थपणे बचावकार्य करत आहेत. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (MMRCC) हे राज्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागांमधील आपत्कालीन बचावकार्याचे समन्वय केंद्र म्हणून कार्यरत आहे. शेकडो प्रशिक्षित गिर्यारोहक, स्वयंसेवक सामाजिक बांधिलकी म्हणून हे कार्य करतात आणि अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतकार्य पार पाडतात.
महाराष्ट्रातील गड-किल्ले हे महाराष्ट्राचा अभिमान असून या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. गड-किल्ल्यांवर किंवा निसर्गस्थळांवर कचरा टाकू नये, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करू नये आणि निसर्गाचा आदर राखावा. पावसाळ्यातील पर्यटनाचा आनंद सुरक्षिततेच्या चौकटीत राहून घ्यावा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी केले आहे.
- आपत्कालीन मदतीसाठी महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (MMRCC)
२४ x ७ हेल्पलाईन नंबरः ७६२०-२३०-२३१
- पावसाळी भटकंती करताना काय करावे?
अनुभवी आणि ओळखीच्या गटासोबतच ट्रेकला जावे.
ट्रेकपूर्वी हवामानाचा अंदाज तपासावा.
ट्रेकची माहिती कुटुंबीयांना किंवा मित्रांना द्यावी.
प्रथमोपचार पेटी, टॉर्च, पॉवर बँक आणि आवश्यक सुरक्षा साहित्य सोबत ठेवावे.
मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जलरोधक पद्धतीने सुरक्षित ठेवावीत.
आवश्यक असल्यास स्थानिक वाटाड्याची मदत घ्यावी.
चालताना गटशिस्त पाळावी आणि लीडरच्या सूचनांचे पालन करावे.
अतिरिक्त कोरडे कपडे आणि आपत्कालीन खाद्यपदार्थ सोबत ठेवावेत.
किल्ले, निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा यांचा आदर राखावा.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित MMRCC हेल्पलाईनशी संपर्क साधावा.
- पावसाळी भटकंती करताना काय करू नये?
X एकट्याने ट्रेक किंवा भटकंती करू नये.
X धोकादायक कडे, तटबंदी, बुरुज किंवा दरडीच्या भागात सेल्फी घेऊ नयेत.
X धबधब्यांच्या प्रपाताखाली किंवा जोरदार पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये.
X ओढे, नाले, नद्या किंवा डोह ओलांडताना धोका पत्करू नये.
X मद्यपान करून किंवा बेफिकीरपणे साहस करू नये.
X धुक्यात किंवा अपरिचित भागात एकटे जाऊ नये.
X विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या जागेत थांबू नये.
X किल्ल्यांवरील अवशेष, तटबंदी किंवा ढासळलेल्या रचनांवर चढू नये.
X कचरा टाकू नये किंवा ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करू नये.
X सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणारे स्टंट करू नयेत.