'एमपीएससी'च्या तीन सेवांची पूर्व परीक्षा आता वर्षातून दोन किंवा अधिकवेळा होणार
पुणे, ता. २७ - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित (गट-अ व गट-ब), महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा आता दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा घेतली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सन २०२७ पासून होणार आहे, असे आयोगाने सांगितले आहे.
याबाबतची माहिती आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. सध्या आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित (गट-अ व गट-ब), महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून केवळ एकदाच घेतल्या जातात.
परीक्षा वर्षातून एकदाच होत असल्याने उमेदवारांवर ताण येतो. ताण कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना यश मिळवण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोगाने या परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या तिन्ही पूर्व परीक्षा म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील. पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा होणार असल्या, तरी संबंधित सेवेची मुख्य परीक्षा मात्र वर्षातून एकदाच घेतली जाईल. संबंधित सेवेच्या घेण्यात आलेल्या दोन किंवा अधिक पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका पूर्व परीक्षेतून पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्या वर्षाच्या संबंधित मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जाईल.
पूर्व परीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरविण्यासंदर्भातील सविस्तर कार्यपद्धती आयोगाकडून लवकरच स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली जाईल, असे आयोगाच्या परीक्षा नियंत्रक व सह सचिव (गोपनीय आणि धोरण व संशोधन) सरिता बांदेकर-देशमुख यांनी सांगितले.