'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मेरा युवा भारततर्फे जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे स्पर्धक पात्र
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने 'मेरा युवा भारत, पुणे' संस्थेच्या वतीने 'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. एमईएस वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व नवरोजी वाडिया कॉलेज येथील टाटा सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धांना जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्रचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या झोन-१ च्या उपायुक्त आशा राऊत, केंद्रीय ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे पी. फणीकुमार, एमईएस वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राचार्या डॉ. मनिषा डाळे, नवरोजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. भारत बहुले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
राऊत यांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी व्यसनमुक्त समाज आणि युवकांचा सकारात्मक सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. या अभियानांतर्गत नृत्य, संगीत, पथनाट्य, घोषवाक्य लेखन, वक्तृत्व, स्लॅम कविता, रील/शॉर्ट फिल्म आणि चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. युवकांनी आपल्या कलाविष्कारातून 'नशामुक्त भारत – विकसित भारत' हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
स्पर्धांमध्ये नृत्य प्रकारात 'ड्रीम ऑफ ड्रामा', नेस वाडिया कॉलेज, संगीत प्रकारात 'सिनास्टिक अँड स्पाइस', वाडिया कॉलेज, पथनाट्य प्रकारात यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, घोषवाक्य लेखनात विद्या विश्वकर्मा, वक्तृत्व स्पर्धेत चैतन्य गर्जे, स्लॅम कविता स्पर्धेत प्रिया पारसनाथ, रील/शॉर्ट फिल्म स्पर्धेत मानव बडगुजार व समूह आणि चित्रकला स्पर्धेत पूर्वा खारकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी आशिष शेटे यांनी केले. सूत्रसंचालन आम्रपाली चव्हाण यांनी केले. कार्यक्रम समन्वयक स्वप्नील शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अमित पाटील आणि डॉ. कोमल सावंत यांनी विशेष सहकार्य केले.