''न्यायालयाने दिलेला निकाल समाधानकारक, फाशीची अंमलबजावणी होईल तेव्हा अजून समाधान होईल'' - चिमुकलीचे आई-वडील
''न्यायालयाने दिलेला निकाल समाधानकारक, फाशीची अंमलबजावणी होईल तेव्हा अजून समाधान होईल'' - चिमुकलीचे आई-वडील
पुणे, ता. २९ - नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आज (ता. २९ जून) फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल दिला. यावेळी चिमुकलीच्या आई-वडीलांना रडू कोसळले. निकालानंतर चिमुकलीच्या वडीलांनी निकालाबद्दल समाधान व्यक्त केले. पोलिस आणि वकिलांचे आभार मानले.
ते म्हणाले, '' हा एक समाधानकारक निकाल आहे. मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण होताना दिसतंय. सरकारडून ज्या आमच्या अपेक्षा होत्या, त्या नक्कीच पूर्णत्वास आल्या आहेत. पण अजून समाधान तेव्हाच होईल, जेव्हा या फाशीची अंमलबजावणी होईल.''
तपासावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले, "मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. पोलीस अधिकारी संदीप गील असतील, सीपी सर असतील किंवा इन्वेस्टिगेशन ऑफिसर विजयमाला पवार असतील, त्यांची सगळी टीम असेल, त्यांनी उत्तम प्रकारे अगदी अपेक्षेप्रमाणे खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय. हा निकाल नक्कीच वरच्या कोर्टात टिकेल. आरोपीचं वय असं आहे की त्याने हे सगळं करणं लज्जास्पद आहे. कायद्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला जसा आज निकाल लागला, तसा नक्कीच लागू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी कायद्यावर विश्वास ठेवा आणि यातून एक मेसेज जातोय की आपला कायदा अशा गुन्हेगारांना फाशीवर लटकवल्याशिवाय सोडणार नाही.''
चिमुकलीच्या आईनेही न्यायालय आणि पोलिसांचे आभार मानले. "गेले दोन महिने आम्ही प्रचंड वेदनेत काढले, मात्र पोलीस आणि वकिलांच्या भक्कम पाठिंब्यामुळे माझ्या चिमुरडीला जलद न्याय मिळाला," अशी भावनिक प्रतिक्रिया आईने दिली.