एसटीच्या पुणे विभागात गेल्या १० दिवसांत ४ हजार ६९८ जणांनी काढले 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड'
Mar 23 2026
43
एसटीच्या पुणे विभागात गेल्या १० दिवसांत ४ हजार ६९८ जणांनी काढले 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड'
पुणे, ता. २३ - सवलतीच्या दरात एसटी प्रवासासाठी ज्येष्ठ नागरीकांना व महिलांना 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' अनिवार्य केले आहे. भविष्यात हे कार्ड नसेल तर प्रवासातील सवलत बंद होणार आहे. त्यामुळे पुणे एसटी विभागात महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी अशी गेल्या १० दिवसांत ४ हजार ६९८ 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' काढले आहे. एसटी प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
याबाबत अधिक महिती देताना प्रशासनाने सांगितले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. प्रवाशांची सुविधा लक्षात घेत महामंडळाने एनसीएमसी कार्डचा नवा निर्णय घेतला आहे. यामुळे तिकीटाचे व्यवहार अधिक सुलभ, सुरक्षित आणि पूर्णपणे पारदर्शक होणार आहेत. सवलतीची प्रवास अचूक नोंद, रोखविरहित व्यवहार आणि पारदर्शक प्रतिपूर्ती ही तिन्ही वैशिष्ट्ये एकाच कार्डमध्ये आहेत. शिवाय कॅशलेस प्रवासाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी ज्येष्ठ नागरीक, अमृत ज्येष्ठ नागरिक व महिला या तीन प्रकारांत हे स्मार्ट कार्ड तयार केले जाते. महिलांना एसटीत ५० टक्के सवलत मिळत असल्याने कार्ड काढण्यासाठी त्यांचीच संख्या जास्त दिसते. पुणे विभागात अमृत ज्येष्ठ नागरिक ११९४, ज्येष्ठ नागरिक १२६० आणि महिला सन्मान २१८६ जणांनी कार्ड काढले आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ६९८ प्रवाशांनी त्यांचे एनसीएमसी कार्डसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये बारामती आगारातून कार्ड काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे, असे प्रशासनाने सांगितले.