पुणे महापालिकेत दोन स्वीकृत नगरसेवकपदासाठी पुन्हा निवड प्रक्रिया
पुणे, ता. २३ - पुणे महापालिकेच्या दहापैकी आठ स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाली आहे. दोन स्वीकृत नगरसेवकांची कागदपत्र अपूर्ण असल्याने त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी आता पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे. यासाठी एका महिन्याचा अवधी लागणार असून, दोन्ही उमेदवारांना नव्याने कागदपत्रे द्यावे लागणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे महापालिकेची निवडणूक ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी झाली. या निवडणूकीत भाजपचे ११९, दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ३० व कॉंग्रेस १५ आणि शिवसेनेचा १ असे नगरसेवक निवडून आले. पुणे महापालिकेत सन २०१७ साली स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच होती. सन २०२३ ला राज्य सरकारने या आदेशात बदल केला. त्यानुसार पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता दहा झाली आहे. यामध्ये भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ व काँग्रेसचा १ स्वीकृत नगरसेवक असणार आहे.
स्वीकृत नगरसेविकांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. या अर्जाच्या छाननीदरम्यान भाजपच्या दोन उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे भाजपच्या ५ उमेदवारांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड होऊ शकली. भाजपच्या राहिलेल्या दोन उमेदवारांसाठी पुन्हा नव्याने नियुक्तीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.