नेहरुनगरमधून बंदूक व पाच जिवंत काडतुसे जप्त, तरुणाला अटक
पिंपरी, ता. १३ - घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश भंग करुन बंदूक व जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी नेहरुनगर येथून अटक केली आहे. त्याच्या जवळची बंदूक व काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई ११ जूनला करण्यात आली आणि १२ जूनला आरोपीवर संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपीचे नाव अजयकुमार गोपाल सिंह (वय ३७, रा. नेहरुनगर) आहे. तो मूळ बिहारचा आहे. आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून लागू करण्यात आलेल्या शस्त्रबंदी आदेशानुसार १० जून ते २३ जून २०२६ या कालावधीत घातक शस्त्र बाळगण्यास मनाई असतानाही आरोपीकडे बिनपरवाना शस्त्र आढळून आले. त्याच्याकडून एक २५ हजार रुपयांची बारा बोअर बंदूक आणि पाच जिवंत काडतुसे, असा एकूण सुमारे २५,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.