ऑनलाईन गाडी विक्रीच्या नावाखाली साडेआठ लाखांची फसवणूक; कर्नाटकातील आरोपीवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २३ - स्वतःकडे मोठे शोरूम असून गाडी विक्रीचा व्यवसाय करतो, असे सांगून व्हॉटसअॅपवर बनावट माहिती देत एका इसमाने फिर्यादीची तब्बल ८ लाख ५१ हजार ६०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फसवणूक झालेल्या इसमाने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रफीक अमिर मुल्ला (वय ५५, रा. महानतेशनगर, बेलगम, हुक्केरी, शिवाजीनगर, कर्नाटक) याने फिर्यादीशी संपर्क साधला. त्याने स्वतःचा गाडी विक्री व्यवसाय असून मोठे शोरूम असल्याचे भासवले. तसेच मारुती सुझुकी इग्निस आणि महिंद्रा थार या गाड्यांचे फोटो व्हॉटसअॅपवर पाठवून त्या कमी किंमतीत उपलब्ध असल्याचे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीकडून आरोपीने वेळोवेळी ८,५१,६०० रुपये घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपीने गाड्या न देता तसेच रक्कमही परत न करता फिर्यादीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.