news
clock
नियमांचे उल्लंघन करुन नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - पंकजा मुंडे

नियमांचे उल्लंघन करुन नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - पंकजा मुंडे

नियमांचे उल्लंघन करुन नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - पंकजा मुंडे

पिंपरी, ता. ११ - पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता. १०) पवना व इंद्रायणी नदी प्रदूषणाची पाहणी केली. नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे आदेश मुंडे यांनी प्रशासनाला दिले. नदी प्रदूषणाच्या कारणांचा अभ्यास करुन सर्व नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी सुरु आहे, असे मुंडे यांनी सांगितले. त्यांनी निगडी-प्राधिकरणातील पीएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेतली. 

पंकजा मुंडे यांच्या या दौऱ्यामध्ये महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त अभिजीत चौधरी, मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्यासह महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमआयडीसी आणि पर्यावरण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दौऱ्यामध्ये झालेल्या बैठकीत, किवळे येथील २० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) प्रकल्पासाठी प्रलंबित शासननिर्णय त्वरित जारी करावा, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये पवना नदीवर  (एसटीपी) तातडीने उभारावा, रावेत व निघोजे बंधाऱ्यांवर अत्याधुनिक एरेटर बसवणे, प्रदूषण होणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी वर्षभरात एसटीपी सुरु करावा आणि त्यासाठी पीएमआरडीए मार्फत जलपर्णी काढण्याची स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ''बहुसंख्य उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट नदीपात्रात सोडले जात आहे. देखभालीअभावी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद होतात. त्यामुळे, नदीत सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांना केवळ नोटीस न बजावता त्यांच्यावर थेट व कठोर कारवाई केली जाईल. पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिकांनी नदीपात्रातील अतिक्रमणे तातडीने काढावीत. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेस 'एसटीपी' सक्तीचा करावा व प्रत्येक नाला 'एसटीपी'ला जोडून केवळ प्रक्रिया केलेलेच पाणी नदीत जाईल, याची दक्षता घ्यावी. ''

याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, ''पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४० लाख नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रावेत आणि निघोजे बंधाऱ्यातील पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. यासाठी महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य शासनाकडे आम्ही सातत्त्याने पाठपुरावा करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात दोन्ही नद्यांचा सुधार प्रकल्प आणि शुद्ध पाणी पुरवठा याबाबत कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार आहोत. पुणे महानगर क्षेत्रातील सर्वच नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी राज्य सरकार निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेत आहे.''





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories