पवना नदीत जनावरांचे मांस फेकण्याचा प्रकार
पिंपरी, ता. ९ - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीचे पावित्र्य धोक्यात आणणारा धक्कादायक प्रकार पुनावळे परिसरात उघडकीस आला आहे. मोठ्या जनावरांची चरबी, चामडे तसेच मांसाचे गाठोडे थेट नदीपात्रात फेकले जात असल्याची बाब पुनावळे येथील काही ग्रामस्थांनी भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या निदर्शनास आणून दिली. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. पर्यावरण विभागाकडू या ठिकाणी उपद्रव शोधक पथक तैनात केले आहे.
पुनावळेच्या काही ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर राम वाकडकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सहायक आरोग्य अधिकारी शांताराम माने, पर्यावरण विभागाचे उपअभियंता पंकज धेंडे, कनिष्ठ अभियंता महेश धावरे, प्रोजेक्ट मॅनेजर राहुल वनवारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. असतान नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कुजलेली चरबी, चामडे आणि मांसाचे गाठोडे आढळून आल्याने उपस्थित सर्वांनाच धक्का बसला.
या प्रकारामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यावेळी, पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार या प्रकाराला पूर्णविराम देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी जालिंदर काटे, ज्ञानदेव काटे, हिरामण गवारे, आकाश रानवडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच जलपर्णी हटवण्यासाठी रावेत बंधाऱ्यावर शुभम शिंदे या कंत्राटी सुपरवायझरच्या देखरेखीखाली काही कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला दररोज अशा घाणेरड्या प्रकाराला सामोरे जावे लागते. नदीपात्रातून दररोज पाच ते सहा गाठोडे बाहेर काढावी लागतात. मात्र नाईलाजाने हे काम करावे लागते. मुंबई बंगळूरु महामार्गावरील पुलावरुन ही गाठोडी पवना नदीत टाकली जातात. त्यामुळे केवळ नदीचे पावित्र्यच नष्ट होत नाही. शहराच्या पाणीपुरवठ्यावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. त्यामुळे या प्रकारामागील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
किळसवाण्या प्रकारांना तात्काळ आळा घालावा.....
''या प्रकाराची मी तीव्र नाराजी व्यक्त करतो. महापालिकेच्या संबंधित विभागांनी समन्वय साधून या किळसवाण्या प्रकारांना तात्काळ आळा घालावा, नदी प्रदूषित करणाऱ्यांवर आजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.'', असे राम वाकडकर यांनी म्हटले आहे.
उपद्रव शोधपथक तैनात
नदीत जनावरांचे मांस फेकल्याची माहिती कळताच तात्काळ आमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही तसेच उपद्रव शोधपथक तैनात केले आहे. हा प्रकार करणाऱ्या अज्ञात इसमांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करणार आहोत.
– योगेश आल्हाट, कार्यकारी अभियंता, महापालिका पर्यावरण विभाग