नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर कार्यवाहीला प्राधान्य द्या - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर कार्यवाहीला प्राधान्य द्या - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर कार्यवाहीला प्राधान्य द्या - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी, ता. १८ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. नागरिकांचे म्हणणे संवेदनशीलतेने व संयमाने ऐकून त्यांच्या तक्रारी, सूचना आणि मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महानगरपालिकेत नागरिकांच्या तक्रारी, सूचना तसेच विविध विषयांबाबत प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी दर मंगळवार व गुरुवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिक भेटीचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत विविध विभागांशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आयुक्त कार्यालयात उपस्थित राहतात. मात्र, नागरिकांची वाढती संख्या आणि त्याचवेळी अनेकदा अचानकपणे येणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण बैठका तसेच स्थानिक स्तरावरील अत्यावश्यक बैठका यांमुळे प्रत्येक नागरिकाला अपेक्षित वेळ देणे अनेकदा शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले प्रश्न, तक्रारी आणि मागण्या प्रथम संबंधित विभागप्रमुखांकडे मांडाव्यात, असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

नागरिकांच्या ज्या तक्रारी तत्काळ निकाली काढणे शक्य आहे, त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी. तसेच ज्या प्रकरणांमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, त्या संदर्भात संबंधित नागरिकांना वस्तुस्थितीची आणि पुढील कार्यवाहीची स्पष्ट माहिती देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

''पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन नागरिककेंद्री आणि उत्तरदायी कामकाजासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडविण्यासाठी माझे प्राधान्य आहे. सर्व खातेप्रमुख यांना देखील नागरिकांच्या समस्यांना प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना दिल्या असून त्याचे पालन न झाल्यास खातेप्रमुखांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना अधिक सुलभ आणि प्रभावी सेवा देण्यासाठी नागरिक भेटीचे नियोजन तसेच तक्रार निवारण प्रक्रिया अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. ''

— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories