महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर बहुमताने निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांचा शुक्रवारी सत्कार
Mar 26 2026
14
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर बहुमताने निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांचा शुक्रवारी सत्कार
पिंपरी, ता. २६ - महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर बहुमताने निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ व ज्येष्ठ कवी राजन लाखे यांचा नागरी सत्कार शुक्रवारी (ता. २७) महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. श्री जगद्गुरू प्रतिष्ठान, अंशुल प्रकाशन व सोहम् सार्वजनिक ग्रंथालय पिंपरी चिंचवड यांच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत तुकारामनगर येथील सोहम सार्वजनिक ग्रथांलयात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस व प्रसिद्ध गझलकार व साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रदीप निफाडकर, शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ व ज्येष्ठ कवी राजन लाखे यांची परिषदेच्या प्रमुख कार्यवाहपदी बहुमताने निवड झाली आहे. ही पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या दोघांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा समारंभ आयोजिला आहे, अशी माहिती आयोजक विजय जगताप, अॅड. लक्ष्मण रानवडे व जगन्नाथ नेरकर यांनी दिली.