news
clock
महापालिकेकडून आरोग्य विभागाला.... प्लास्टिक कचरा संकलन वाहन हस्तांतरीत

महापालिकेकडून आरोग्य विभागाला.... प्लास्टिक कचरा संकलन वाहन हस्तांतरीत

महापालिकेकडून आरोग्य विभागाला.... प्लास्टिक कचरा संकलन वाहन हस्तांतरीत

पिंपरी, ता. २६ - शहरतील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध  करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्लास्टिक कचरा संकलन वाहन आरोग्य विभागाला देण्यात आले आहे. ‘समुदायांच्या माध्यमातून प्लास्टिक कृती स्थानिकीकरण (एलपीएसी)’ या अभिनव उपक्रमांतर्गत हे वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

दापोडी येथील संकलन केंद्रात वाहन हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी  उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी पूजा दूधनाळे,  सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे,  श्रीराम गायकवाड,  मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी,  आरोग्य निरीक्षक सचिन जाधव यांच्यासह युमिकोअर ऑटोकॅट इंडिया प्रा. लि. चे राजीव कदम, अभिषेक कुलकर्णी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांच्या उत्कर्षा कवडी, प्राची मेढे, श्रुती जोशी, युनिसेफचे प्रतिनिधी जसप्रीत गुरुम, आनंद घोडके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, युवक, महिला, नागरिक उपस्थित होते. 

स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागातून प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर अधिक परिणामकारक करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, मुंबई यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. युनिसेफ महाराष्ट्र आणि युमिकोअर ऑटोकॅट इंडिया प्रा. लि. यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. विविध संस्थांच्या समन्वयातून साकारलेला हा उपक्रम शहरासाठी एक आदर्शवत ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

अधिकाऱ्यांनी प्लास्टिक संकलन केंद्राची पाहणी करुन तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली. स्वयं-सहायता गटातील महिलांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.  नवीन संकलन वाहनामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्लास्टिक कचरा संकलन व प्रक्रिया अधिक वेगवान, कार्यक्षम आणि शाश्वत होणार आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शहर उभारणीच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 प्रास्ताविक उत्कर्षा कवडी यांनी केले. प्राची मेढे यांनी सूत्रसंचालन केले.

 कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा थेट सहभाग

''‘एलपीएसी’ सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा थेट सहभाग वाढत असून शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहर उभारणीस गती मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत राहील.''

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

 कचरा व्यवस्थापन सुलभ 

''प्लास्टिक कचरा व्यवस्थापन ही केवळ यंत्रणांची जबाबदारी नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. ‘एलपीएसी’ उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर सुलभ होणार असून पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यास मोठी मदत होईल.''

– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त,  पिंपरी चिंचवड महापालिका

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories