शाळा सुरु होताच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करावी, नगरसेविका श्रुती वाकडकर यांची मागणी

शाळा सुरु होताच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करावी, नगरसेविका श्रुती वाकडकर यांची मागणी

 शाळा सुरु होताच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करावी, नगरसेविका श्रुती वाकडकर यांची मागणी

पिंपरी, ता. ३ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांची शाळा सुरु झाल्यानंतर तत्काळ आणि सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या श्रुती वाकडकर यांनी शिक्षण समिती सभापती रविना आंघोळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी केली जाते ही स्वागतार्ह बाब असली, तरी सध्या ही तपासणी मर्यादित स्वरुपात होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही वेळा तपासणी उशिरा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमधील आरोग्यविषयक समस्या वेळेत निदर्शनास येत नाहीत. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उंची, वजन, दृष्टी, दंत तपासणी, हिमोग्लोबिन, त्वचा, पोषण स्थिती तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी तातडीने झाल्यास विविध आजार व शारीरिक समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत उपचार मिळून त्यांच्या आरोग्यासह शैक्षणिक प्रगतीलाही मोठा फायदा होईल.

त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांची शाळा सुरु झाल्यानंतर कोणताही विलंब न करता व्यापक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. तपासणी केवळ औपचारिक न राहता आवश्यक त्या सर्व वैद्यकीय घटकांचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणि उपस्थितीत वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories