पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रमांनी जागतिक जल दिन साजरा
पिंपरी, ता. २५ - जागतिक जल दिन २२ मार्च रोजी असतो. पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमध्ये जागतिक जल दिन पथनाट्य, प्रदर्शन, मार्गदर्शन व चर्चासत्र या कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. उपस्थितांनी जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.
सायन्स पार्कमध्ये “माझी नदी, माझीच जबाबदारी” या हे प्रदर्शन आयोजित केले होते. जलदिंडी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वास येवले यांनी “जागतिक जल दिनाचे महत्त्व” सांगितले.
हाऊसिंग सोसायटीमध्ये पाणी बचतीचे मार्ग व “वॉटर ऑडिट” यावर डॉ. प्राजक्ता रुद्रावार (निगडी) यांनी प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली.
एनएसएस युनिट, जेएसपीएम कॉलेज ताथवडे यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “जल हेच जीवन” या पथनाट्याद्वारे पाणी संवर्धनाचा संदेश नागरीकांपर्यंत पोहोचविण्यात आला. बालसमूहाद्वारे सादर करण्यात आलेल्या नाट्यप्रयोगातूनही पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
“पर्यावरण विषयक परिसंवाद” या विषयावर विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसंवादात अंघोळीची गोळी संस्थेचे माधव पाटील, 'इसीजी'चे सिकंदर घोडके, सिताराम बल्लाळ फाउंडेशनचे विष्णू शेठ वाळुंज, 'सिटीझन फोरम'चे तुषार शिंदे तसेच सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया यांचा सहभाग होता. या चर्चेत पाण्याची साठवण, शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी मनपाद्वारे राबविण्यात येणारी स्काडा प्रणाली, शहरातील पर्यावरणविषयक दृष्टिकोन आणि जनसहभाग यावर चर्चा झाली. सर्वांनी जल दिनाची प्रतिज्ञा घेतली.