महापालिकेची गेल्या अडीच महिन्यांत शहरात ८२० ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई

महापालिकेची गेल्या अडीच महिन्यांत शहरात ८२० ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई

महापालिकेची गेल्या अडीच महिन्यांत शहरात ८२० ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई

१०४ हजार चौरस मीटरहून अधिक अनधिकृत बांधकामे भुईसपाट, 

नाले, रस्ते व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेची मोहीम सुरु राहणार

पिंपरी, ता. २२ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ, नाले तसेच अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये एकूण ८२० ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ४५१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे १ लाख ४ हजार २७०.९६ चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध नाल्यांवरील २३ अतिक्रमणे हटविण्यात आली असून अंदाजे ८३९ चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे.

याशिवाय सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाले, पथारीवाले आणि इतर अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली. या कालावधीत अशा एकूण ३४६ अतिक्रमणांचे निर्मूलन करण्यात आले.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाहता सर्वाधिक २२९ कारवाया क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत करण्यात आल्या. त्याखालोखाल इ क्षेत्रीय कार्यालयात १०३, ड क्षेत्रीय कार्यालयात १००, फ क्षेत्रीय कार्यालयात ९५, ब क्षेत्रीय कार्यालयात ९४, अ क्षेत्रीय कार्यालयात ८४, ग क्षेत्रीय कार्यालयात ६४ आणि ह क्षेत्रीय कार्यालयात ५१ कारवाया करण्यात आल्या.

शहरातील नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवणे, पावसाळ्यात पूरस्थिती टाळणे, सार्वजनिक रस्ते आणि पदपथ नागरिकांसाठी सुरक्षित व मोकळे ठेवणे तसेच अनधिकृत बांधकामांना आळा घालणे या उद्देशाने ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना अनधिकृत बांधकामे आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांना प्रोत्साहन न देण्याचे तसेच शहर स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिक्रमणविरोधी कारवाई पुढेही सुरुच राहणार  

“सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ आणि नाले हे नागरिकांच्या वापरासाठी असून त्यांच्यावर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे नागरी सुविधा आणि सुरक्षिततेवर परिणाम होतो. त्यामुळे अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही शहर सुबक आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे.”

- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories