पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक
शहरातील नाले सफाई, रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक सुविधा, स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, पालखी सोहळा तयारी, अग्निसुरक्षा या विषयांवर चर्चा
पिंपरी, ता. ३ - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीमध्ये शहरातील नाले, रस्ते, सार्वजनिक सुविधा, स्वच्छता व्यवस्था यांसह अतिक्रमण निर्मूलन, पालखी सोहळ्याची तयारी आणि अग्निसुरक्षा यांसह विविध विषयांबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात नुकतीच बैठक झाली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, अजय सूर्यवंशी, मनोज सेठिया, उप आयुक्त सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल, संदीप खोत, सीताराम बहुरे, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, अमित पंडित, तानाजी नरळे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे आदी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, १) शहरातील नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील याची खात्री करावी. ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत तेथील नाल्यांची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन कामांची गुणवत्ता आणि परिणामकारकता तपासावी.
२) पाणी साचण्याची किंवा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा संवेदनशील भागांमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आणि कार्यान्वित असल्याची खात्री करावी.
३) आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्यासाठी ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
४) महापालिकेच्या वतीने शहरासाठी स्वतंत्र 'टॉयलेट पॉलिसी' तयार करण्यात येत असून, त्यासाठी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अचूक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्यात यावे, जी स्वच्छतागृहे जीर्णावस्थेत आहेत किंवा नागरिकांच्या गरजांनुसार अपुरी ठरत आहेत, त्याठिकाणी आधुनिक सुविधा असलेली स्वच्छतागृहे उभारण्यावर भर देण्यात यावा.
५) महिलांसाठी बसविण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन्स कार्यरत असल्याची नियमित खातरजमा करावी.
६) अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घ्या. महापालिका मालकीच्या इतर जागांवर होणाऱ्या अतिक्रमणांवर नियमित कारवाई करा.