पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी केली पालखी मार्गाची पाहणी, महापालिका व महामेट्रो प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी केली पालखी मार्गाची पाहणी, महापालिका व महामेट्रो प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना
पिंपरी, ता. २ जुलै २०२६ - जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३४१ वा आषाढी वारी-२०२६ पालखी सोहळ्याचे प्रस्थान दिनांक ७ जुलै २०२६ रोजी होणार आहे. सदर आषाढी वारी व पालखी सोहळा सुरळीतपणे व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बुधवारी, १ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र देहू येथील मंदीर परिसर व संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी केली.
श्री क्षेत्र देहू येथील मुख्य मंदीर व परिसर पाहणी दरम्यान जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान कार्यालयास भेट दिली. संस्थानचे अध्यक्ष जालिंदर विश्वनाथ मोरे महाराज, विश्वस्त गणेश उत्तम मोरे व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पालखी सोहळ्यादरम्यान येणाऱ्या अडचणींसंबंधी पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. गर्दीचे व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था दृष्टीने कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच आषाढी वारी व पालखी सोहळयात सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सुरक्षित व शांततेच्या मार्गाने संपूर्ण सोहळा भक्तीमय वातावरणात सर्वांच्या सहकार्याने व समन्वयाने पार पाडला जाईल, असे पोलिस आयुक्तांनी आश्वस्त केले.
पोलिस आयुक्तांनी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पालखी रथाची पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराज मंदीर व परिसरात दर्शनबारी दरम्यान होणाऱ्या गर्दीचे नियंत्रणासाठी रस्सी तसेच योग्यप्रकारे बॅरीकेटींगचा वापर करणे बाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे वतीने पोलिस आयुक्त व इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पालखी मार्गावरील विसाव्याची ठिकाणे अनगडशहाबाबा दर्गा व चिंचोलीगाव येथील श्री. शनि मंदीर येथे भेट देवून पाहणी केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील
पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी भक्ती-शक्ती चौक निगडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे व महामेट्रोकडील अधिकारी उपस्थित होते. पालखी मार्गावरील भक्ती-शक्ती चौक ते मोरवाडी चौक दरम्यान पुणे मेट्रोचे काम सुरु असून मेट्रोचे मोठमोठे कॉलम व बॅरीकेटींग यामुळे हा मार्ग अरुंद झालेला आहे. या मार्गाची पाहणी करुन मेट्रोच्या अधिकाऱ्यांना बॅरीकेटींग आतमध्ये सरकवून पालखी करीता मार्गातील अडथळे काढणे, आवश्यक त्या ठिकाणी भक्कम संरक्षक जाळ्या बसवून घेणे, राडारोडा हटवून रस्ता समतल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पालखी मार्गात शक्य त्या ठिकाणी रस्ता रुंद व्हावा या करीता रस्त्याच्या कडेचा राडारोडा हटवून रस्ता समतोल करणे, पालखी मार्गात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांदया काढून टाकणे, पालखी मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या कमानी काढून टाकणे याबाबत सूचना देण्यात आल्या.
या पाहणीच्या वेळी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, आपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली, परिमंडळ ४ च्या पोलिस उप आयुक्त श्वेता खेडकर, परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त संदिप आटोळे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे शाखा रोहीदास पवार, परिमंडळ - ३ चे पोलिस उप आयुक्त मारुती जगताप, विशेष शाखेचे पोलिस उप आयुक्त धीरज पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस उफ आयुक्त विक्रांत देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदिप जंगम, उपायुक्त प्रदीप ठेंगल, महामेट्रोचे अभियंता यतेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.