पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता पीएमपीएमएल कडून सन २०२६-२०२७ करिता अनुदानित पासेसचे वितरण सुरू
पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता पीएमपीएमएल कडून सन २०२६-२०२७ करिता अनुदानित पासेसचे वितरण सुरू
पुणे, ता. १६ - सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता पुणे मनपा शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वी चे विद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांना ७५% सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरू करण्यात येत आहे.
सदरील पासेससाठी दिनांक १५/०६/२०२६ पासून अर्जाचे वाटप पुण्यातील एकूण १२ आगारांमधून व सर्व पास केंद्रांवरून सुरू करण्यात आलेले आहे. भरून दिलेले अर्जही आगारांमध्येच स्वीकारण्यात येतील. १) स्वारगेट, २) न.ता.वाडी, ३) कोथरूड, ४) कात्रज, ५) हडपसर, ६) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, ७) पुणे स्टेशन, ८) बालेवाडी, ९) भेकराईनगर, १०) शेवाळेवाडी, ११) बाणेर, १२) वाघोली ही आगारांची नावे आहेत.
संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या वरील नमूद आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात. तसेच सदरचे अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते पास शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही.
खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पास रकमेच्या २५% रकमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल. ते चलन विद्यार्थ्यांनी पुणे मनपा हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्ज, चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून वरील नमूद आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल.
प्रस्तुत योजनेसंबंधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये उपलब्ध आहे. पुणे मनपाचे शाळेतील व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासेसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४