ज्येष्ठ नागरीकांना वाढदिवशी मिळाल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या शुभेच्छा !
पिंपरी, ता. २१ - वाढदिवसाला आपल्याला नातेवाईक आणि मित्रपरिवार शुभेच्छा देतच असतात. त्याबरोबरच, आपल्याला लांबच्या कोणीतरी अचानक शुभेच्छा दिल्या तर वेगळाच आनंद होईल. हाच अनपेक्षित आनंद पिंपरी-चिंचवड पोलिस ज्येष्ठ नागरीकांना देत आहे. आपपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरीकांच्या वाढदिवशी त्यांच्या घरी जाऊन किंवा वृद्धाश्रमात जाऊन पोलिस शुभेच्छा देत आहेत आणि अर्थातच या उपक्रमातून पोलिस आणि नागरीकांमधला बंध अधिक दृढ होत आहे.
गेल्या दोन दिवसांत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिक श्रीमती सुशीला कपालदास गुलार्णी, (वय ६१ वर्षे, रा. नवताजधाम वृध्दाश्रम, अंबी, ता. मावळ), श्रीमती पद्मा किशोर सरपोद्दार (वय ७७ वर्षे, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), नयन रमाकांत पानसरे (वय ७४ वर्षे, रा. हिंजवडी) यांची समक्ष भेट घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे वाढदिवस साजरे केले. तेव्हा ते ज्येष्ठ नागरिक आनंदून गेले. हा उपक्रम दैनंदिन स्तरावर आयुक्तालयाच्या हद्दीत साजरा केला जाणार आहे.
यानिमित्ताने, पोलिसांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी विकसित केलेल्या "ज्येष्ठानुबंध" या अॅप्लिकेशनची माहिती दिली. "ज्येष्ठानुबंध" या अॅप्लिकेशनद्वारे ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस खात्यासबंधी तसेच त्यांच्या वैयक्तीक इतर अडचणी मांडल्यावर त्यांना पोलीसांकडून तात्काळ मदत पुरविली जात आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीतील एकूण २८,००० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.
"ज्येष्ठानुबंध" उपक्रमास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ज्येष्ठानुबंध अॅप डाऊनलोड करुन त्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे.