news
clock
महिलांच्या सुरक्षेसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी  महापालिका व पोलिसांची संयुक्त बैठक घ्यावी - अभिषेक बारणे

महिलांच्या सुरक्षेसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी महापालिका व पोलिसांची संयुक्त बैठक घ्यावी - अभिषेक बारणे

महिलांच्या सुरक्षेसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी  महापालिका व पोलिसांची संयुक्त बैठक घ्यावी - अभिषेक बारणे 

पिंपरी, ता. ६ -  नसरापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरातील जनतेचा संताप उफाळून आला आहे.  या घटनेचे अत्यंत तीव्र पडसाद मंगळवारी (ता. ५)  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या घटनेचा निषेध करताना शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील महिलांची सुरक्षा आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी आग्रही मागणी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी या बैठकीत केली.


महापौर रवी लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अभिषेक बारणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. बारणे म्हणाले की, ''नसरापूरची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे आणि ती समाजाच्या संवेदनशीलतेवर मोठा आघात आहे. अशा घटनांमध्ये बळी पडलेल्या कुटुंबांची अवस्था काय असेल, याची कल्पनाही करवत नाही. अनेकदा पिडीत कुटुंबावर सामाजिक किंवा इतर दबाव असतो. त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी केवळ तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून फिर्यादीची भूमिका पार पाडावी, जेणेकरून खटला अधिक मजबूत होईल आणि गुन्हेगारांना फाशीसारखी कठोर शिक्षा मिळेल.''

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी यंत्रणा राबवण्याची गरज असल्याचेही बारणे यांनी नमूद केले. ''शहरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय आणि नवीन लोक वास्तव्यास येत असतात, त्यामुळे शहरातील सर्व भाडेकरूंची अधिकृत नोंदणी होणे आता अनिवार्य झाले आहे. या प्रक्रियेत दिरंगाई होता कामा नये. तसेच, नसरापूर घटनेच्या तपासात काय निष्पन्न झाले आणि न्यायालयीन निकालाची सद्यस्थिती काय आहे, याची सविस्तर माहिती महापालिकेच्या कायदा विभागाने संकलित करावी. शहरातील सर्व १२८ विद्यमान नगरसेवकांना या निकालाची माहिती मिळायला हवी, कारण प्रभागातील नागरिक आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारत असतात आणि त्या ठिकाणी उत्तर देणे नगरसेवकांना कठीण जात आहे.'', असे बारणे म्हणाले.

''परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी एकमेकांशी समन्वय साधून शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत व्यापक चर्चा करावी. केवळ आश्वासन नको तर जमिनीवर ठोस उपाययोजना दिसल्या पाहिजेत,'', असा इशाराही बारणे यांनी यावेळी दिला. सभेच्या शेवटी, नसरापूर घटनेशी संबंधित सर्व माहिती आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पुढील बैठक आयोजित करण्यापूर्वी सभागृहासमोर सादर करावा, असे आदेशही देण्यात आले. या चर्चेत शहरातील इतर नगरसेवकांनीही सहभाग घेत महिला सुरक्षा आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी लावून धरली.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories