शहर पोलिस दलातील वाहनचालक रवींद्र सांगळे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, आरपीय वाहतूक आघाडीची पोलिस आयुक्तांकडे मागणी
शहर पोलिस दलातील वाहनचालक रवींद्र सांगळे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, आरपीय वाहतूक आघाडीची पोलिस आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, ता. ७ - पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयातील मोटार परिवहन विभागातील चालक रवींद्र सांगळे यांच्या मृत्यूची घटना संशयास्पद आहे. त्याच्या मृत्यूची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करावी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, सांगळे यांच्या कुटुंबास तत्काळ आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वाहतुक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख व पुणे जिल्हा उपाध्यक्ष गजानन घुगे यांनी केली पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणात त्वरीत व न्याय्य कारवाई न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा अजिज शेख यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन पोलिस आयुक्त कार्यालयात देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयातील मोटार परिवहन विभागातील चालक रवींद्र सांगळे (रा. खोकरलेता. शिरूर कासार, जि. बीड) यांच्या मृत्यूची घटना अत्यंत संशयास्पद असून, ही बाब केवळ अपघाती स्वरूपाची नसून अधिकाऱ्यांकडून होणारा छळ व मानसिक दबावाचा परिणाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगळे यांच्यावर मानसिक दबाव टाकला गेला असण्याची दाट शक्यता आहे. याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
सांगळे हे बीड जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबास तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य व तक्रार निवारण यंत्रणा प्रभावीपणे राबवावी, असे निवेदनात म्हटले आहे.