मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त भोसरी विधानसभेत भाजपचे अनेकविध उपक्रम
- आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात जनसंपर्क अभियान; 'विकसित भारत संमेलना'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ८ हजार वृक्षारोपण; विविध मंदिरांमध्ये महाआरती आणि प्रभागनिहाय भव्य योग कार्यक्रम
पिंपरी, ता. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या प्रीत्यर्थ, महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या आदेशानुसार भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध जनहितार्थ आणि संघटनात्मक कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. १ ते ३० जून या कालावधीत चालणाऱ्या या विशेष अभियानांतर्गत भोसरीमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुमारे ८ हजार वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, १० जून रोजी मतदारसंघातील विविध मंदिरांमध्ये प्रभागनिहाय महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेचा मुख्य भाग म्हणून ११ ते १५ जून दरम्यान आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष जनसंपर्क अभियान राबवण्यात आले. यादरम्यान मंडलनिहाय विकासकामांची पाहणी, 'विकसित भारत संमेलन', 'स्वच्छ भारत अभियान' आणि नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
याच अभियानाचा भाग म्हणून १५ ते १७ जून दरम्यान 'शासकीय योजनांचे जनकल्याण शिबीर' आयोजित करण्यात आले आहे. तसेच २१ जून रोजीच्या 'जागतिक योग दिनाचे' प्रत्येक भागातील नगरसेवक व पदाधिकारी यांनी चोख नियोजन केले असून, २५ जून रोजी 'आणीबाणीला ५१ वर्षे (आपत्काल के ५१ साल)' या कार्यक्रमाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले आहे. 'विकसित भारत संमेलनात' बोलताना आमदार महेश लांडगे यांनी मोदी सरकारच्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला.
भारताचा स्वाभिमान आणि अर्थव्यवस्था मोदींनी उंचावली: आमदार महेश लांडगे
संमेलनात नागरिकांना संबोधित करताना आमदार महेश लांडगे म्हणाले,
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ वर्षांची कारकीर्द ही देशाचा स्वाभिमान, शक्ती आणि आत्मसन्मान जागृत करणारी ठरली आहे. २०१३-१४ मध्ये देशाचा 'जीडीपी' (GDP) १०३ लाख कोटी रुपये होता, तो आज ३५७ लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. मोदींच्या काळात यात तिप्पट वाढ झाली आहे. पूर्वीच्या युपीए सरकारच्या काळातील परावलंबी अर्थव्यवस्था बदलून मोदींनी गुंतवणुकीच्या माध्यमातून नव्या संधी निर्माण केल्या आणि 'गरीब कल्याण' व 'अंत्योदय'च्या माध्यमातून गरिबांना स्वतःच्या पायावर उभे केले."
पुढे बोलताना आमदार लांडगे यांनी जागतिक पातळीवरील भारताच्या कणखर भूमिकेचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमध्ये देशातील शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून भारताने अमेरिकेसारख्या देशांसोबतही करारात शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवले आहे. आज युरोपसह अनेक देशांसोबतच्या व्यापारात भारत 'ट्रेड सरप्लस' (व्यापारी नफा) स्थितीत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
'डिजिटल क्रांती'मुळे जमिनीवरील भ्रष्टाचार नष्ट: विकास डोळस
याप्रसंगी भाजप जिल्हा महामंत्री विकास डोळस म्हणाले, "मोदी सरकारने देशात आणलेली डिजिटल क्रांती गेमचेंजर ठरली आहे. भारताने विकसित केलेले 'UPI' पेमेंट गेटवे आज जगातील २५ पेक्षा जास्त देश वापरत आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात दिल्लीतून निघालेल्या १ रुपयातील केवळ १५ पैसे गरिबांपर्यंत पोहोचायचे, कारण तेव्हाची वितरण पद्धत सदोष होती. मात्र मोदींनी 'UPI' आणि 'जन-धन' खात्यांची अभेद्य साखळी तयार केल्याने शासकीय योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. यामुळे जमिनीवरील भ्रष्टाचार संपवण्यात देशाला मोठे यश आले आहे."
प्रत्येक बूथ पातळीवर मायक्रो नियोजन : प्रमोद परदेशी
दिघी-भोसरी-गवळीनगर मंडळाचे अध्यक्ष प्रमोद परदेशी यांनी सांगितले की, आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीतील प्रत्येक अभियान यशस्वी होत असून संपूर्ण भोसरी मतदारसंघ भाजपमय झाला आहे. आगामी काळात बूथ पातळीवर प्रत्येक शासकीय योजना आणि भाजपाचे संघटनात्मक अभियान पोहोचवण्याचे मायक्रो नियोजन करण्यात आले आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप जिल्हा महामंत्री विकास डोळस आणि वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटणी यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर नगरसेविका नानी घुले, श्रुती डोळस, कविता भोंगळे, सोनाली गव्हाणे, राणी पठारे; नगरसेवक नितीन लांडगे, सागर गवळी, उदय गायकवाड, जालिंदर शिंदे, कृष्णा सुरकुले; माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, आशा सुपे; संजय गायकवाड, कुलदीप परांडे, माजी सैनिक भिसे काका, प्रवीण पाटील, सुशांत पवार, रमेश विरनक, अमीर शेख, पंकज शर्मा, अनिकेत भुलाडे, इंद्रजित भोसले, नामदेव राढे, कल्पना पाटील, तुकाराम महाजन, मुरलीधर पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.