मोदी सरकारची १२ वर्षे 'विश्वास आणि विकासाचा' सुवर्णकाळ - खासदार मुरलीधर मोहोळ
पुणे, ता. १५ - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत देशाचा चेहरामोहरा बदलला असून हा काळ भारताच्या इतिहासातील 'विश्वास, विकास आणि जनकल्याण' साधणारा सुवर्णकाळ ठरला आहे," असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. मोदी सरकारच्या १२ व्या वर्षांच्या गौरवार्थ सोमवारी (ता. १५) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यशस्वी १२ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांचा व विकासकामांचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षाच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली.
गेल्या १२ वर्षांत देशाने पायाभूत सुविधा, राष्ट्रीय सुरक्षा, डिजिटल इंडिया, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, स्टार्टअप इंडिया, कृषी विकास तसेच जागतिक स्तरावर भारताची वाढलेली प्रतिष्ठा यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साध्य केली. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या मंत्राच्या आधारे केंद्र सरकारने जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत विकसित भारत २०४७ या संकल्पनेवरही विशेष भर देण्यात आला. देशाला आत्मनिर्भर,सक्षम आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असल्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेस पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे,पुणे उत्तर शहराध्यक्ष प्रदिप कंद, पुणे दक्षिण शहराध्यक्ष चंद्रशेखर वढणे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील विकासाच्या दिशेने केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे स्वागत केले.