पुनावळे येथील माध्यमिक शाळेच्या आरक्षणाची जागा खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर
पुनावळे येथील माध्यमिक शाळेच्या आरक्षणाची जागा खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर
पिंपरी, ता. १६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यातील पुनावळे येथील माध्यमिक शाळेच्या आरक्षणाची ९१ गुंठे जागा ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला जोरदार विरोध होऊनही हा प्रस्ताव सोमवारी (ता. १६) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापौर रवी लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
पुनावळे येथील माध्यमिक शाळेच्या आरक्षणाची ९१ गुंठे जागा ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यास स्थानिक नागरीकांनी तसेच सामाजिक संस्थांनी विरोध केला आहे. सोमवारी हा विषय महापालिका सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. या प्रस्तावाविरोधात शिवसेनेच्या वतीने महापालिका मुख्यालयात आंदोलन करण्यात आले.
पुनावळे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेता सदर जागेवर महानगरपालिकेने स्वतःची आधुनिक व दर्जेदार शाळा उभारावी, पुनावळे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणासाठी हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा,अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित असलेली जागा खाजगी संस्थेला देणे हे जनहिताच्या विरोधात आहे. पुनावळेची एकच हाक, लीजचा प्रस्ताव रद्द करा, शाळेची जागा शाळेलाच द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
सभेमध्ये चर्चेदरम्यान भाजपच्या चारही स्थानिक नगरसेवकांनी विरोध केला. राहुल कलाटे म्हणाले, ''या जागेची निविदा प्रसिद्ध करताना स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेतले नाही. प्रशासनाने निविदा काढण्याची घाई का केली, खासगी संस्थेला जागा दिली, या शाळेत ४० टक्के जागांवर गरिबांच्या मुलांना प्रवेश द्यावेत.''
नगरसेवक कुणाल वाव्हळकर म्हणाले, ''कोट्यवधी रुपयांची जागा खासगी संस्थेला देऊ नये. त्या ठिकाणी श्रीमंतांच्या मुलांसाठी शाळा उभारली जाईल. त्यापेक्षा महापालिकेने गरीब मुलांसाठी अत्याधुनिक शाळा उभारावी. महापालिकेची जागा खासगी संस्थेला देणे दुर्दैवी असून, हा विषय दप्तरी दाखल करावा.'',
नगरसेविका श्रुती वाकडकर म्हणाल्या, ''वाकड-पुनावळे-ताथवडे परिसरातील आरक्षित जागा भाडेतत्त्वावर देण्यापूर्वी या भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून येथे महापालिकेची स्वतःची सीबीएससी पॅटर्न शाळा उभारण्यात यावी. वाकड येथे महापालिकेने सावित्रीबाई फुले सीबीएससी पॅटर्न शाळा उभारली आहे. त्याच धर्तीवर पुनावळे आणि ताथवडे येथेही महापालिकेची दर्जेदार सीबीएससी शाळा विकसित करावी.'' नगरसेविका रेश्मा भुजबळ, माया बारणे यांनीही जागा खासगी संस्थेला देण्यास विरोध केला. मात्र, त्यानंतरही महापौरांनी या विषयाला उपसूचनेसह मंजुरी दिली.