शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रोमार्गावर येत्या १५ दिवसांत बसविणार... 'रुट मार्कर'
बोअरवेलच्या कामात मेट्रोच्या बोगद्यालाच छिद्र पडल्याच्या प्रकारामुळे तातडीने उपाययोजना
पुणे, ता. २६ - शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या मंडई स्थानकाजवळ बोअरवेलचे काम सुरु असताना थेट मेट्रोच्या बोगद्यालाच छिद्र पडल्याने मेट्रो मार्गत पाणीगळती होऊ लागल्याचा प्रकार घडला आहे. पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून मेट्रो प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत. येत्या १५ दिवसांत मेट्रो मार्गावरील जमिनीवर येत्या १५ दिवसांत 'रुट मार्कर' बसवण्यात येणार आहे. त्यामुळे, शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंत जमिनीखाली भुयारी मेट्रो मार्ग आहे, ही माहिती नागरिकांना मिळणार आहे आणि आता या मार्गावर बोअरवेल खोदण्यासाठी 'मेट्रो'चे 'ना-हरकत प्रमाणपत्र' नागरिकांना घ्यावे लागणार आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
याबाबत पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ म्हणाले, "मेट्रोच्या भुयारी मार्गाला छिद्र पडण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे काटेकोर उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. जमिनीपासून सुमारे ८० ते १०० फूट खाली मेट्रोमार्ग आहे. या बाबत जागृती करण्यात येईल. सर्व गृहरचना संस्था, घरांना मेट्रो याबाबत पत्र पाठविणार आहे. बोअरवेल खोदण्यासाठी नागरीकांना मेट्रोची परवानी घ्यावी लागेल. महापालिका आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडेही संपर्क साधला जाणार आहे."
शिवाजीनगर-स्वारगेट हा भुयारी मेट्रोमार्ग सुमारे ५ किलोमीटरचा आहे. त्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. या मार्गावर शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय, कसबा पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट ही स्थानके आहेत. येथे पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून मेट्रो प्रशासन तातडीने उपाययोजना करत आहे.