पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्यार्थी युरोपियन स्पेस सेंटरला भेट देणार
पुणे, ता. २४ - पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्यार्थी येत्या शैक्षणिक वर्षात बेल्जियममधील युरोपियन स्पेस सेंटरला भेट देणार आहेत. जिल्हा परिषदेकडून सध्याच्या शैक्षणिक वर्षात नासा आणि इस्रोला विद्यार्थी पाठविण्याचा पहिल्यांदाच उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम उल्लेखनीय ठरला. त्यामुळे जिल्हा परिषद हा उपक्रम पुढे नेत आहे. स्पेस सेंटरच्या भेटीत विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचे प्रात्यक्षिक अनुभवता येणार आहे, रॉकेट व उपग्रह तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी ही संधी अनमोल आहे.
चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रोला भेटीसाठी पाठवले होते. यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आंतरविद्यापीठीय खगोलविज्ञान व खगोलभौतिकीशास्त्र केंद्र (आयुका) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभ्यासक्रम तयार केला होता. या अभ्यासक्रमावर आधारित तीन टप्प्यांची निवड परीक्षा घेण्यात आली. अंतिम टप्प्यात आयुकामध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थ्यांना इस्रोच्या भेटीसाठी व २५ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा संस्थेच्या भेटीसाठी पाठवण्यात आले. हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिशा देणारा आहे. म्हणूनच, जिल्हा परीषद यंदा उपक्रमाची व्याप्ती वाढवत आहे. यंदा २५ विद्यार्थ्यांना बेल्जियममधील युरोपियन स्पेस सेंटरला पाठविण्यात येणार आहे. बेल्जियममधील ट्रान्सिन येथे असलेले युरोपियन स्पेस सेंटर हे युरोपमधील प्रमुख अंतराळ शिक्षण केंद्रांपैकी एक आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
युरोपियन स्पेस सेंटरच्या दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेने वेळापत्रक जाहीर केले आहे.
1) पहिली चाचणी जून महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहे. ही परीक्षा केंद्रशाळा स्तरावर होणार असून, बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपाची असेल. 2) दुसरी चाचणी जुलै अखेर, ऑनलाइन असेल.
पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत दुसरी चाचणी घेतली जाणार आहे. 3) तिसरी चाचणी १५ ऑगस्टपूर्वी होणार आहे. यामध्ये आयुकाकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे.