देशात पावसात तब्बल ४३ टक्क्यांची मोठी घट, सरकारच्या उपाययोजना सुरु - केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
देशात पावसात तब्बल ४३ टक्क्यांची मोठी घट, सरकारच्या उपाययोजना सुरु - केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
पुणे, ता. २४ - देशात आतापर्यंत पडलेल्या पावसात तब्बल ४३ टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली आहे. देशातील हवामानावर एल निनोचे संकट आहे. मान्सून मंद वेग २ जुलैपर्यंत असाच राहू शकतो. त्यामुळे मान्सूनच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेती क्षेत्रावर परिणाम होणार आहे. संभाव्य संकट ओढवण्याची वाट न पाहता सरकारने आधीच उपाययोजना सुरू केल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील १२ राज्यांतील तब्बल ३१५ जिल्ह्यांमध्ये यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी (ता. २३ जून) पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारने ५० टक्के सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या ७६ जिल्ह्यांना 'मध्यम प्राथमिकता' श्रेणीत ठेवले आहे. १२८ जिल्हे चांगल्या स्थितीत असून तिथे धरणे व इतर माध्यमांद्वारे सिंचनाची सोय आहे. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा ही राज्ये धोक्याच्या छायेत आहेत. कृषी मंत्रालयाने संवेदनशील जिल्ह्यांसाठी तयार केलेल्या आपत्कालीन योजनांमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे हवामान, पीक पद्धती, जलस्रोत आणि स्थानिक धोके लक्षात घेऊन स्वतंत्र उपाययोजना आखल्या आहेत.
यामध्ये कमी पाऊस झाल्यास पर्यायी पिकांची निवड करणे, पिकांमध्ये बदल करणे, मर्यादित पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित ठेवणे या उपायांचा समावेश आहे. एल निनो आणि मान्सूनच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी मंत्रालयाचा 'एल निनो मॉनिटरिंग सेल' आणि 'क्रॉप वेदर वॉच ग्रुप' सतत कार्यरत आहेत, अशी माहिती कृषी मंत्री चौहान यांनी दिली. पिकांचे व पाण्याचे नियोजन, मदत यंत्रणा प्रभावीपणे राबवल्यास कमकुवत मान्सून असूनही शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या नुकसानीपासून वाचवता येऊ शकते, असे चौहान यांनी सांगितले.