गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर फडकला नवा ध्वज
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर फडकला नवा ध्वज
पुणे, ता. २१ - हिंदू नववर्षाच्या (चैत्र प्रतिपदा) पावन मुहूर्तावर अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर नवा ध्वज फडकवण्यात आला आहे. शनिवारी (ता. २१) वैदिक मंत्रोच्चारांच्या जयघोषात मंदिराच्या शिखरावरील ध्वज बदलण्यात आला. हा नवा ध्वज रघुकुलाची मर्यादा आणि आधुनिक विज्ञानाचे प्रतीक आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मंदिराच्या शिखरावर डौलाने फडकणाऱ्या या ध्वजावर तीन अत्यंत महत्त्वाची चिन्हे आहेत.
ध्वजावरील सूर्यदेव - प्रभू श्रीराम 'सूर्यवंशी' असल्याचे प्रतीक आणि त्यांच्या तेजाचे दर्शन आहे, कोविदार वृक्ष - रघुकुलाची परंपरा, वंशाचा गौरव आणि मर्यादांचे प्रतिनिधित्व सांगतो, 'ॐ' (ओम) - ब्रह्मांडाचा मूळ ध्वनी आणि सनातन धर्माची आध्यात्मिक शक्तीचे प्रतिक आहे.
हा कोणताही साधा कापडी ध्वज नाही तर हा ध्वज कानपूर येथील 'आयुध पॅराशूट कारखान्यात' (Ordnance Parachute Factory) विशेष लष्करी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला आहे. कडक ऊन, मुसळधार पाऊस किंवा वादळी वाऱ्यातही या ध्वजाचा रंग फिका पडणार नाही किंवा तो फाटणार नाही. पॅराशूटसाठी वापरल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या साहित्याचा यात वापर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वतः मंदिराच्या शिखरावर पहिला ध्वज स्थापित केला होता. आता ही परंपरा पुढे नेली जात असून, दरवर्षी चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र या दोन वेळा हा ध्वज बदलला जाणार आहे.ॉ