महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडी सदैव तत्पर - यशवंत भोसले
महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडी सदैव तत्पर - यशवंत भोसले
पिंपरी, ता. २२ - "गेल्या १८ वर्षांपासून राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटना महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या न्यायिक हक्कासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक समस्येवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी संघटना सदैव तत्पर आहे." असा विश्वास राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंत भोसले यांनी कामगारांना दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील संघटनेच्या सभासद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे 'राष्ट्रीय श्रमिक आघाडी'च्या वतीने नुकतेच भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी यशवंत भोसले यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या, ज्यावर भोसले यांनी सविस्तर चर्चा करून त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत, आगामी काळातही त्यांच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने महानगरपालिकेतील सभासद कर्मचारी उपस्थित होते.