गाडीचे हफ्ते न भरल्याच्या कारणाने रिकव्हरी एजंट्सकडून ग्राहकावर चाकूने वार
पिंपरी, ता. ११ - गाडीचे हफ्ते न भरल्याच्या कारणावरुन रिकव्हरी एजंट असलेल्या तिघांनी एका तरुणाच्या कारची काच फोडून त्याच्यावर चाकूने वार केले. ही घटना रविवारी (ता. १९) दुपारी अडीजच्या सुमारास मोशी येथे पुणे-नाशिक 'हाय-वे'वर घडली. तिन्ही आरोपी युवकांना पोलिसांनी अटक केली आहे व त्यांच्याविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, जखमी कारचालक संदिप सोपान कड (वय ३८ वर्षे, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) यांनी तक्रार दिली आहे. या घटनेत प्रकाश तानाजी जाधव (वय - २५ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), दत्ता पुरुषोत्तम कल्याणी (वय ३० वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) व सूरज तुकाराम कुसाळकर (वय - २५ वर्षे, रा. दुर्गामाता नगर, चिंचवड) या तिन रिकव्हरी एजंट्सला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी संदिप कड हे त्यांच्या चारचाकीमधून घरी जात असताना यातील आरोपींनी त्यांच्या गाडीला दुचाकी आडवी लावून थांबवले. गाडीचे हफ्ते न भरल्याच्या कारणावरुन व गाडी न थांबवल्याच्या कारणावरुन संदिप यांना शिवीगाळ केली व त्यांच्या गाडीची काच फोडून चाकूने उजव्या दंडावर वार करुन जखमी केले.
आरोपींविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५(२),३५२, १२६(२),३२४(४),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.