प्रत्येक रिक्षा चालकाने जबाबदारीने व शिस्तबद्धपणे वागणे हेच प्रगतीचे सूत्र - डॉ. बाबा कांबळे
प्रत्येक रिक्षा चालकाने जबाबदारीने व शिस्तबद्धपणे वागणे हेच प्रगतीचे सूत्र - डॉ. बाबा कांबळे
महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान
पिंपरी, ता. २४ - ''प्रवासी हेच आपले दैवत आहे. त्यांना सेवा देताना मीटरनेच व्यवसाय करण्याला प्राधान्य द्या, भाडे नाकारू नका. शहरात फोफावलेल्या बेकायदेशीर वाहतुकीमुळे रिक्षा व्यवसायात बकालपणा येत आहे, यावर कडक नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन प्रशासनाकडे आक्रमकपणे पाठपुरावा करणे काळाची गरज आहे. रिक्षा-टॅक्सी व्यवसायाची प्रतिमा उंचावून प्रवाशांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येक चालकाने जबाबदारीने व शिस्तबद्धपणे वागणे, हेच आपल्या प्रगतीचे सूत्र आहे.'', असा महत्त्वाचा सल्ला ‘महाराष्ट्र रिक्षा पंचायत’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांना दिला.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या संघटनात्मक कार्याला नवी गती देण्यासाठी पंचायतीच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत महाराष्ट्र रिक्षा पंचायत मुख्य कार्यालय, पिंपरी (पुणे) येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा गोरगरीब कष्टकऱ्यांचे बुलंद नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या हस्ते २० जूनला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व नियुक्ती सोहळा झाला. त्यानंतर चिखलीगाव येथील ऐतिहासिक गणपती मंदिर मुख्य कमान परिसरात महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी डॉ. बाबा कांबळे यांनी रीक्षाचालकांना मार्गदर्शन केले.
डॉ. कांबळे म्हणाले, ''ऑटो, टॅक्सी व कॅब चालक-मालक बांधव हे समाजाचा कणा आहेत. या कष्टकऱ्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणे, त्यांचा राजकीय व सामाजिक सन्मान जपून त्यांना हक्काचे अस्तित्व मिळवून देणे हेच महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अंतिम ध्येय आहे. गेल्या २० वर्षांपासून आपली संघटना रिक्षा चालक, टॅक्सी-कॅब चालक आणि असंघटित कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहे. रिक्षा-टॅक्सी व्यवसायाची प्रतिमा उंचावून प्रवाशांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येक चालकाने जबाबदारीने व शिस्तबद्धपणे वागणे, हेच आपल्या प्रगतीचे सूत्र आहे. भोसरी मतदारसंघातील आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून भोसरी मतदारसंघातील रिक्षा टॅक्सी चालक व असंघटित कामगारांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडले जात आहेत, असे नमूद करून डॉ. बाबा कांबळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या की, चिखली, जाधववाडी, मोई आणि तळवडे या भागांतील रिक्षाचालकांच्या अडीअडचणींना सर्वोच्च प्राधान्य देऊन संघटनेचे कार्य अधिक गतिमान व जनभिमुख करावे.''
या सोहळ्यात पंचायतीचे नवनियुक्त पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजय ढगारे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता धनंजय कुदळे आणि पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष दीपक ताटे यांना पगडी, शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.या नवीन नेतृत्वाकडून संघटनेच्या कार्याला नवीन गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महापालिका फेरीवाला समितीच्या सदस्या आशा कांबळे, मेजर प्रदीप बावस्कर, युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष नाना गुंड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरज सोनवणे, डी-मार्ट रिक्षा स्टॅन्डचे अध्यक्ष सुनील कदम, दत्ता गिले, अंतोनी पंडित यांच्यासह संघटनेचे अनेक जेष्ठ पदाधिकारी, रिक्षा चालक-मालक व निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते. चिखली येथील श्रीराम रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब डवरी, बापू देशमुख, उमेश गाडेकर, माऊली लगाडे, सागर डवरी, हरिदास सावंत, मनोज ठाकूर आणि प्रकाश दुबे यांनी केले.